नवीन राज्य सांस्कृतिक धोरणासाठी शासनस्तरावर समिती गठीत करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुधारित सांस्कृतिक धोरण आणण्याची गरज असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नवीन धोरणासाठी शासनस्तरावर एक समिती गठीत करून कालबद्ध कार्यक्रमांतर्गत त्याच्या शिफारशी सादर करण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.

नवीन सांस्कृतिक धोरण संदर्भातील आढावा बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून याच निमित्ताने सर्वसमावेशक असे सांस्कृतिक धोरण अंमलात आणण्यात येईल. सांस्कृतिक कार्य  विभागामार्फत सांस्कृतिक धोरण तयार करण्याचे काम करण्यात येणार असून यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची समिती गठीत करण्यात येणार आहे. २०१० मधील धोरणामध्ये, नव्याने काही घटकांचा अंतर्भाव करण्यासाठी सूचना मागविण्यात येतील असेही श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले.