ग्राहकांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. १५ : ग्राहक हक्कांबद्दल तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाबद्दल लोकांना माहिती द्यावी. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची गरज असून समाजातील सुज्ञ लोकांनी ग्राहक जनजागृतीच्या कार्याशी जोडले गेले पाहिजे. पीडित ग्राहकांना शीघ्र गतीने न्याय मिळण्यासाठी राज्यातील ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त राज्य  ग्राहक न्यायालयातर्फे आयोजित चर्चासत्राला संबोधित करताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, आज पारंपरिक दुकानांशिवाय ई-कॉमर्सच्या माध्यमातून लोक वस्तू विकत घेत आहेत. अनेकदा ग्राहकांना नवनवीन अडचणी येत असतात परंतु त्यांचे निवारण कसे व कुठे करायचे हे त्यांना माहिती नसते. ग्राहक न्यायालयांनी केवळ न्यायदानाचे काम न करता व्यापारात नैतिकतेचा आग्रह धरला पाहिजे. ग्राहक न्यायालयांनी इंग्रजीचा वापर न करता स्थानिक भाषेत कार्यालयीन कामकाज करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली.

राज्यात विविधस्तरावर फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळविण्यासाठी न्याय व्यवस्था उपलब्ध आहे. केंद्राने ग्राहक संरक्षणासाठी चांगले कायदे केले आहेत. कै. बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कासाठी मोठे काम केल्याचे स्मरण देऊन राज्यातील ग्राहक न्यायालयांनी न्यायदानाबाबत नवी दिशा दिली पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी राज्य ग्राहक न्यायालयाचे सदस्य डॉ. संतोष काकडे यांनी जागतिक ग्राहक दिन चर्चासत्र आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्रात राज्य ग्राहक न्यायालयचे माजी अध्यक्ष न्या. आर.सी.चव्हाण, न्या. अशोक भंगाळे, माजी सदस्य, केंद्रीय ग्राहक न्यायालय राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव आदींनी सहभाग घेतला.