शासकीय व खाजगी रुग्णालयांनी खाटांची संख्या तात्काळ वाढवावी अन्यथा कडक कारवाई करणार-विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

  • गृह अलगीकरण करताना अधिकचे शुल्क घेणाऱ्यांवर कारवाई करणार
  • आवश्यक औषधांचा साठा पुरेसा प्रमाणात
  • खाजगी दवाखान्यांनी लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवावी
  • संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कन्टेंनमेंट झोन वाढवावेत
  • सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
May be an image of 2 people, people standing, people sitting and text that says 'ਧਾਈ माझे कुटुंब माझी जबाबदारी'

औरंगाबाद, दिनांक 14 – कोरोना संसर्गाचा आज पर्यंत मराठवाड्याने मोठ्या धैर्याने सामना केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने या परिस्थितीचा पूर्ण क्षमतेने सामना करण्यासाठी सर्व रुग्णालयांनी आदेशित केल्याप्रमाणे येत्या तीन दिवसांत खाटांची उलब्धता करावी अन्यथा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज संबंधितांना दिला.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी खाजगी व शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मणियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर तसेच शहरातील विविध खाजगी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री केंद्रेकर म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. ऑक्टोबर 2020 महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यात 3520 खाटा कोवीड रुग्णासांठी राखीव ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी 1546 खाटांवर सध्या कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी कोविडचा प्रभाव कमी झाल्याने उर्वरित 1974 खाटांवर नॉन कोविड रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळले आहे. ह्या उर्वरित खाटा देखील संबंधित रुग्णालयांनी लवकरात लवकर कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत श्री केंद्रेकर म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत अनेक रुग्णालयांना खाटा वाढविण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये धुत हॉस्पिटलला 150 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 87 खाटा वाढविल्या, हेडगेवार हॉस्पीटलला 200 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 72 खाटा वाढविल्या तर बजाज हॉस्पीटलला 150 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 50 खाटा वाढविल्या, तसेच एमआयटी, जे.जे.प्लस , सावंगीकर आणि माणिक हॉस्पीटलने देखील निर्देशित केल्याप्रमाणे खाटा न वाढविल्याने या रुग्णालयांना साथरोग अधिनियम 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005 अन्वये नोटीस देऊन उर्वरित खाटा येत्या तीन दिवसांत वाढविण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले. तसेच एमजीएम हॉस्पीटलला 200 तर घाटीला 508 खाटा वाढविण्याच्या सुचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्‍या. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी दवाखान्यांची वाढीव उपचार सुविधेसह प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात वाढीव खाटा उपलबध केल्या आहेत की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येऊन वाढीव खाटा उपलब्ध न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही श्री केंद्रेकर यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांनी यावेळी उदिष्टापेक्षा अधिक प्रमाणात खाटांची उपलब्ध केलेल्या रुग्णालयांचे यावेळी कौतुक देखील केले. कृष्णा हॉस्पीटलने 50 खाटांचे उद्दिष्ट्य दिलले असताना 61 खाटा वाढविल्या, लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने 29 खाटांचे उद्दिष्ट्य दिलेले असताना 42 खाटा वाढविल्या त्याबद्दल तर एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलने 80 चे उद्दिष्ट्य दिलेले असतना अधिकच्या 50, युनायटेड सिग्मा हॉस्पीटलने 100 चे उद्दिष्ट्य दिलेले असतना अधिकच्या 50 खाटा वाढविणार असून ममता हॉस्पिटलला देखील तांत्रिक सहाय्य पुरविणार असल्याचे सांगितल्याने विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.