राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन

मुंबई, दि. ७ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल त्यांचे सांत्वन केले.

भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण

      भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार चंद्रकांता गोयल (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.    

     रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पुत्र पीयूष, प्रदीप आणि कन्या प्रतीभा व प्रमिला यांच्यासह सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भाजपाचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांच्या त्या पत्नी होत्या.

      प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चंद्रकांता गोयल यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

     ज्येष्ठ नेत्या चंद्रकांता गोयल सर्वप्रथम १९७८ साली मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून सायन परिसरातून निवडून आल्या. त्यांनी १९९० साली माटुंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ही जागा भाजपाला मिळवून दिली. १९९०, ११९५ व १९९९ अशा सलग तीन वेळा त्या विधानसभा निवडणुकीत माटुंगा येथून विजयी झाल्या. ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने त्या राजकारणात आल्या होत्या. त्यांनी २००४ साली स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र व देशाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना माटुंगा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची पक्षाची उमेदवारी देण्यास त्यांनी विरोध केला व आपल्या मुलाने स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करावी, असा आग्रह धरला.

      त्यांचा तत्वनिष्ठ स्वभाव होता. त्या राष्ट्रीय विचारांच्या होत्या व त्यांचा समाजसेवेचा पिंड होता. आपल्या मुलांवर आणि सहकारी कार्यकर्त्यांवर त्यांनी हेच संस्कार केले. कार्यकर्त्यांमध्ये त्या चंद्रकाताबेन म्हणून परिचित होत्या. पती वेदप्रकाश यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब जनसंघ व भाजपाला समर्पित होते. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना गोयल कुटुंबाने आस्थेने मदत केली. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्या सामाजिक कार्यात सहभागी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *