‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास केंद्रित अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी

नांदेड,13 मार्च, 2021 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प एकूण २६०.८१ कोटी रुपयाचा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांचा विकास केंद्रित धरून विद्यापीठाच्या भौतिक तसेच संशोधनात्मक शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यासाठी एन.पी.टी.एल. लोकल चॅप्टरद्वारे संलग्नित महाविद्यालयांना प्रोत्साहित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन अधिसभेची बैठक दि. १२ मार्च रोजी पार पडली.  या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्‍वर हसबे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते. या अर्थसंकल्पावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, अधिसभा सदस्य डॉ. एस.एम.जोगदंड, डॉ. डी.एन. मोरे, डॉ. सिंकु कुमार, आशिष बाजपेयी, डॉ. दिपक साठे, प्रा. सुरज दामरे, डी.आर.तोष्णीवाल, यांनी आपली मते मांडली. एकूण २६० कोटी रुपयांचा या अर्थसंकल्पात या वर्षी ४१.४४ कोटी रुपयांची तुट आहे. विशेष म्हणजे गत वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तूट ४८.६८ कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच या वर्षी ७.२४ कोटी रुपयांची तुट कमी झाली आहे.

विद्यार्थी विकास केंद्रित या  अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना मिळण्यासाठी अनेक उपाय योजनेसह तरतूद केली आहे. संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च असोशियन या योजनेअंतर्गत मानधन या शीर्षकांतर्गत मार्च अखेर २० लक्ष उपलब्ध असून पुढील वर्षासाठी २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी दत्तक योजना’ याकरिता १५ लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. ‘सॉफ्ट स्किल अँड पर्सनालीटी, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर’ करिता २५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘कुलगुरू साह्यता निधी योजने’ करिता १५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘विद्यार्थ्यांनी कल्याण दत्तक योजना’  याकरिता १५ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षात परदेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरिता १० लक्ष रुपयांची तरतूद करून दिली आहे. ‘स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास केंद्रा’ करिता २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ‘स्टुडंट्स वेलफेअर अँड अवार्ड स्कीम’ या योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्याकरिता १० लाख तरतूद करण्यात आली आहे. एम.फिल., पी.एचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रासाठी पेपर वाचन करण्याकरिता १५ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत २० लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थ्यासाठी पारितोषिक योजनेकरिता ५ लक्ष  तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी विकास विभागांतर्गत पारितोषिक योजना करिता २५ लाख तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण चर्चासत्र परिषद इत्यादीना हजर राहण्यासाठी १० लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे. कर्मचारी कल्याण निधीकरिता १५ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ साठी उपाययोजनेकरिता १५ लक्ष, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी २२ लक्ष, कोव्हीड-१९ उपचारासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अग्रिम ५० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महिला जागृती विषयक कार्यशाळा करिता ५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यापीठात दिव्यांग सहाय्यता  अंतर्गत ६.३५ कोटी प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या बरोबरच विद्यापीठ परिसर सुशोभित करण्याकरिता उद्यान विभागास १०७ लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातील विकासाबरोबरच विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद करण्यात आली आहे. न्यू मॉडल डिग्री कॉलेज हिंगोलीसाठी महाराष्ट्र शासन अनुदान अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. तर सोलार सिस्टिम करिता ३० लक्ष तरतूद करण्यात आली. कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट अंतर्गत आवर्ती खर्चासाठी ३४ लक्ष व अनावर्ती खर्चासाठी १४ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. लातूर येथील उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींच्या वस्तीग्रह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली. परभणी येथील इमारत बांधकामासाठी १५० लक्ष तरतूद करण्यात आली. विद्यापीठाने सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन लाईफ लॉंग लर्निंग ची स्थापना करण्यासाठी महाविद्यालयांना भरीव तरतूद करून प्रोत्साहित केले आहे.

यामध्ये संशोधन प्रोत्साहन योजनाकरिता १५ लक्ष महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे परिषदा सेमीनार इत्यादी योजना करिता २० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयीन संशोधक  प्रकल्पासाठी ५० लक्ष तरतूद तर विद्यापीठ संकुलासाठी शिक्षक संशोधकांसाठी २० लक्ष तरतूद करण्यात आली. संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदा उपस्थित राहण्यासाठी १५ लक्ष आणि संकुलातील १५ लक्ष तरतूद करण्यात आली. भाषा दिन करिता ७ लाख तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा करिता ५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली.

असा हा विद्यार्थी विकास केंद्रीय अर्थसंकल्प अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.