आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत लौरा पिगोस्सी व मारियाना झकारल्यूक यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे, 13 मार्च 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी, युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक यांनी अनुक्रमे ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथ व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

Displaying Laura Pigossi of Brazil.jpg


डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझिलच्या तिसऱ्या मानांकित लौरा पिगोस्सी हिने सहाव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. लौराने इमेलीचे आव्हान 1तास 9मिनिटात सहज परतावून लावले. पहिल्या सेटमध्ये लौराने सुरुवातीपासूनच इमेलीवर वर्चस्व राखले. पहिल्या , तिसऱ्या गेमला लौराने इमेलीची सर्व्हिस ब्रेक करून 3-0अशी आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या इमेलीला लौराने कमबॅक करण्याची संधी फारशी दिली नाही. पाचव्या गेमला लौराने इमेलीची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व 5-0 अशी विजयी आघाडी घेतली. अखेर सहाव्या गेममध्ये इमेलीने लौराची सर्व्हिस भेदली. पण आघाडीवर असलेल्या लौराने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत सातव्या गेमला इमेलीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील लौराने आपला दबदबा कायम राखला. या सेटमध्ये लौराने इमेलीची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून विजय मिळवला.

Displaying Marianna Zakarlyuk of UKR.jpg


दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत पाचव्या मानांकित युक्रेनच्या मारियाना झकारल्युक हिने दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुचा टायब्रेकमध्ये (5)6-7, 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 3 तास 13मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात 5-5 अशी बरोबरी असताना दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखला व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 6-5 अशा फरकाने मारियाना आघाडीवर असताना डबल फ़ॉल्ट केला व हा सेट बुलगारुने 7-6(7-5) असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये बुलगारुने आक्रमक खेळ करत दुसऱ्या गेममध्ये मारियानाची सर्व्हिस ब्रेक केली व 3-0 अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या मारियानाने जोरदार कमबॅक करत पाचव्या, सातव्या गेममध्ये बुलगारुची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मारियानाने बुलगारूची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला. 
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 3935 डॉलर(2,86,000रुपये) आणि 50 डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 2107डॉलर (1,54,000रुपये) व 30 डब्लूटीए गुण जदेण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीचा सामना आज (14 मार्च रोजी) सकाळी 10वाजता होणार आहे. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्य(मुख्य ड्रॉ)फेरी: महिला:
लौरा पिगोस्सी(ब्राझील)(3)वि.वि.इमेली वेबली-स्मिथ(ग्रेट ब्रिटन)(6)6-1, 6-1;
मारियाना झकारल्युक(युक्रेन)(5)वि.वि.मिरीयम बियांका बुलगारु(रोमानिया)(2)(5)6-7, 6-4, 6-4.