औरंगाबादेत आजपासून अंशत: लॉकडाऊन 

शिस्तीसह अंशत: लॉकडाऊन यशस्वी करावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

May be an image of one or more people, people sitting, people standing and indoor

औरंगाबाद, दि.10, :- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दि. 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अंशत: लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनचे सर्व नागरीक, आस्थापनांनी काटेकोरपणे पालन करून घेण्यात आलेला लॉकडाऊन यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व संबंधित यंत्रणांना आज येथे दिल्या.

          जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना संसर्ग व प्रतिबंध व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने,  घाटीचे डॉ. दिक्षीत, डॉ. ज्योती बजाज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, अन्न औषध प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपनिबंधक अनिल दाबशेडे यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

          यावेळी श्री. चव्हाण यांनी वाढीव रूग्णसंख्येच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्नांतून लावण्यात आलेला अंशत: लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशित केले. या लॉकडाऊन कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम यांसह सर्वांनी वेळेचे बंधन पाळत दिलेल्या निर्देशानुसार व्यवसाय करणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे दुकान सिल करावे. तसेच विना मास्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करावे. सर्व आस्थापना नियमित चाचण्या करून खबरदारीचे सर्व उपाय, नियम पाळतील याची कटाक्षाने यंत्रणांनी पाहणी करून नियंत्रण ठेवावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्परतेने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

          तसेच सर्वांनी नियमांचे पालन करत कोविड संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. उद्यापासून कोणत्याही प्रकारचे आंदोलने, सभा, कार्यक्रम होणार नाही. तसेच पेट्रोलपंपावर नो मास्क नो पेट्रोल याची अधिक कडक अंमलबजावणी करावी. आरटीओ कार्यालयांनीही विनामास्क येणाऱ्या कुणालाही परवाना, इतर सेवा देऊ नये तसेच तातडीने रिक्षा युनियनची बैठक घेऊन रिक्षाचालक आणि प्रवासी यांना मास्क व इतर कोविड नियमांचे पालन करण्याबाबत संबंधितांना निर्देशित करावे. सर्व आस्थापना, वाहतूक व्यावसायिक यांना दर पंधरा दिवसांनी चाचणी करणे बंधनकारक असून लॉकडाऊन नियमावलीसह सर्वांकडून मास्क वापर, सॅनिटाायजर, सामाजिक अंतराचे पालन या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर होणे हे वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी खूप गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्या अखत्यारीतीतील घटकांकडून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सूचित केले.

          तसेच वाढीव प्रमाणात चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवावी. संसर्गाची गती लक्षात घेऊन उपचार सुविधासह यंत्रणांनी तयार रहावे. या आपत्तीजनक परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी समन्वय आणि नियोजनपुर्वक सक्रीयपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना यावेळी दिले.