धारदार चाकूने हल्ला करून युवकाची निर्घुणपणे हत्या

औरंगाबाद, दिनांक 10 :मित्रांसोबत दुचाकीवर जाणार्‍या 22 वर्षीय युवकावर धारदार चाकूने हल्ला करून त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी दि.10 मध्यरात्रीच्या सुमारास मोतीकारंजा-अंगुरीबाग परिसरात घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी तपास करुन सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गुन्ह्यातील चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना शनिवारपर्यंत दि.13 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी दिले.
 नितीन उर्फ गब्ब्या भास्करराव खंडागळे (27), त्याचा भाऊ सोमनाथ खंडागळे (31), बहिण दिपाली भास्करराव खंडागळे (35) आणि आई रत्ना भास्करराव खंडागळे (65, सर्व रा. अंगुरीबाग, तुळजाभवानी मंदीरा समोर) अशी आरोपींची नावे आहे.
प्रकरणात मयत सय्यद दानिश सय्यद शफीयोद्दीन (22, रा. अंगुरीबाग) याचा काका सय्यद रफीउद्दीन सय्यद अमीनोद्दीन (22) याने फिर्याद दिली. त्यानूसार, बुधवारी दि.10 पहाटे सव्वाबारा वाजता फिर्यादी, मुजमील खान, आमीर खान असे तिघे अंगुरीबाग येथील चबुतर्‍यावर बोलत उभे होते. तर आरोपी नितीन उर्फ गब्ब्या हा मुखरम याच्या किराणा दुकानाजवळ सिगारेट पीत उभा होता. त्यावेळी नक्षकार्ड गल्‍लीतून बाबा, सलीम व शेख जब्बार उर्फ शम्मू असे तिघे दुचाकीवर येत असतांना दुकानाजवळ उभ्या असलेल्या नितीन उर्फ गब्ब्या याने अचानक त्यांच्यावर चाकू हल्‍ला चढवला. यात सय्यद दानीशोद्दीन याच्या पोटात चाकूचा वार बसल्याने तो जागीच कोसळला. हा प्रकार पाहून फिर्यादी नितीनच्या हातातील चाकू घेण्यासाठी धावला असता त्याने फिर्यादीवर देखील वार करुन जखमी केले. तर उर्वरित दोघा जखमींनी त्याला विरोध केला असता आरोपीच्या भाऊ, बहिण व आईने त्यांना जबर मारहाण करुन जखमी केले.
या घटनेनंतर सय्यद दानीशोद्दीन याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
अंगुरीबाग परिसरात युवकाचा खून झाल्याची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अंगुरीबाग परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या भागात दंगा नियंत्रण पथक तैनात केले आहे.
 आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का तसेच आरोपींचा गुन्हा करण्यामागील नेमका उद्देश काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील चौघा आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी सुनावली.
————————————–