डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. ६ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६) डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ दिनांक १७ जून रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. शिर्के (जन्म ११ जून १९६५) यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अश्विनी कुमार नांगिया आणि राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.