जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

जालना,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरिता तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

May be an image of one or more people, people standing and balloon

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. सत्तार यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मनुज जिंदल,  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्य लढयातील योगदान अत्यंत मोलाचे होते व यापासून युवा पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.   भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या गौरवशाली पर्वानिमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. तसेच “घरोघरी तिरंगा” हा उपक्रमही जिल्ह्यात  यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.

May be an image of 4 people, people standing and outdoors

श्री. सत्तार पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यात मिशन 75 दिवस हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.  या उपक्रमा अंतर्गत विविध विभागांनी 75 दिवसांमध्ये अनेक विकासात्मक कामे केली. यामध्ये महसूल विभागाने 75 समाधान शिबीरांच्या माध्यमातून  नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्याचबरोबर वृक्ष लागवड, जलपुर्नभरण, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे, शेततळे, पाणंद रस्ते, तलावातील गाळ उपसणे, सुंदर माझे गाव योजना, मियावाकी वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, महिला बचतगटांना कर्ज वाटप, तुती लागवड आदी उपक्रमही विविध विभागांमार्फत यशस्वीरित्या राबविण्यात आले.  जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला आहे.

शेतकऱ्यांना पिकांची नोंद करण्यास सोयीचे जावे यासाठी नवीन ई-पीक ॲप व्हर्जन-2 विकसित करण्यात आले आहे, असे सांगून श्री. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांनी हा सुधारीत अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीकांची नोंद विहित वेळेत पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरेल. जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये एकूण 6 लक्ष 25 हजार 439 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पातंर्गत  जालना जिल्ह्यातील 363 गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये  54 प्रकारच्या विविध घटकांचा समावेश आहे. कामे पूर्ण केलेल्या 56 हजार 874 लाभार्थ्यांना 405 कोटी 21 लक्ष रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसुचित जातीच्या 626 लाभार्थ्यांच्या विहिरींची कामे सुरु झाली असुन त्यासाठी 11 कोटी 76 लक्ष एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे.

श्री. सत्तार म्हणाले की, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत चालू वर्षात सात लाभार्थ्याची निवड करण्यात आली आहे. यासाठी 11 लक्ष 47 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.   महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 69 हजार 288 शेतकऱ्यांना 1 हजार 59 कोटी 59 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपया पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. सन 2022-23 या वर्षात जालना जिल्ह्यासाठी खरीप पीक कर्ज वाटपाचा 1 हजार 220 कोटी तर रब्बी पीककर्ज वाटपाचा 480 कोटी असा लक्षांक देण्यात आला आहे.  जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत  1 लक्ष 9 हजार 761 शेतकऱ्यांना 716 कोटी 57 लक्ष रुपयांच्या खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले  आहे.    हरित जालना करण्यासाठी यंदा जिल्ह्यात 25 लक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

कोव्हीड या आजारामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटवर्तीयांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयानुसार जालना जिल्ह्यात 1 हजार 474 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.  त्यापैकी 1 हजार 359 अर्जदारांच्या खात्यामध्ये रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे.   सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातुन प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक डोस तसेच पात्र व्यक्तींनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जालना जिल्ह्यात अमृत सरोवर योजनेतून विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.  तसेच लोकसहभागातून शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्त्यांची 335 किलोमीटर व नालाखोलीकरण व नाला सरळीकरणाची 19 किलोमीटरची कामे पूर्ण करण्यात आली असून याचा 14 हजार 437 शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यात 1 हजार 371 मातोश्री पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले आहेत.  तसेच  607 सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.  ही कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच तुती लागवड, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, वैयक्तिक सिंचन विहिरी, गोठे, शौचालय, शोष खड्डयांची कामेही हाती घेण्यात आली असुन यामुळे ग्रामीण भागामध्ये पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.  पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती हा उत्तम पर्याय आहे. जालना जिल्ह्यात रेशीम शेतीला अधिक चालना देण्यात येत आहे.  रेशीम कोष उत्पादनामध्ये आपला जालना जिल्हा महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.   जालना जिल्ह्यातून अधिक चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलासह प्रत्येक तालुकास्तरावर क्रीडा संकुल विकसित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

भाषणानंतर श्री. सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, मान्यवर व नागरिकांची भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कॉफी टेबल बुक, रोहयो विभागाच्या लोकसहभागातून पाणंद रस्ता पुस्तिका व शिक्षण विभागाच्या महाराष्ट्रातून फेरफटका व अंतराळाविषयी पुस्तक तसेच महाराष्ट्राचा नकाशा व सूर्यमालेचा चार्ट या किट संचाचे  विमोचन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील शहीदांचे वीरपिता, तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार  श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.