कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा-केंद्रीय पथकाचे प्रमुख  कुणाल कुमार 

Displaying IMG_20200725_172415.jpg

औरंगाबाद दि.25, (जिमाका) :- जिल्ह्यातील व शहरातील कोरोना साथ परिस्थितीचा आज केंद्राच्या पथकाने सविस्तर आढावा घेतला. पथकाचे प्रमुख  कुणाल कुमार यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कोरोनावर नियंत्रणासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा व महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या  उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, केंद्रीय पथकातील सदस्य डॉ. अरविंद कुशवाह, डॉ. सितीकांता बॅनर्जी,  महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, सर्व उपविभागीय अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, खाजगी रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी कुणाल कुमार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना आणि येत असलेल्या अडचणी तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन, खाटांची उपलब्धता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना, मनुष्यबळ व निधीबाबत माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांच्या मनातील या आजाराविषयीची भिती दूर करणे आवश्यक आहे, यासाठी जनजागृती करण्याबरोबरच संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती तपासणीत पॉझिटिव्ह  आढळून आल्यास त्याला तात्काळ उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, यासाठी व्यवस्थापन पध्दत सतत अदयावत ठेवणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन तेथील रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देऊन चार आठवड्यात परिस्थिती पूर्ववत करण्याबाबत दक्षता घ्यावी. कोरोना विरुध्दच्या या लढाईत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सूचित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबतची एकंदरीत स्थिती, करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यातून मिळालेले यश याची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. तसेच महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील परिस्थिती व प्रभावीपणे राबविण्यात येत असलेले उपक्रम, आरोग्य  सुविधा याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.  यावेळी डॉ. कुशवाह यांनी देखील मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थित डॉक्टर, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडूनही कुणाल कुमार यांनी कोरोनाबाबतची  माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *