प्रगत आणि ‍डिजिटल शाळा झाल्या दुप्पट

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 05-04-2018 | 12:19:47 am
  • 5 comments

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल

 प्रगत आणि ‍डिजिटल शाळा झाल्या दुप्पट

मुंबई, दि. 4 : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 47 हजारहून अधिक शाळा प्रगत तर 63 हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिेक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रगत आणि डिजिटल शाळा होण्याचे प्रमाण हे जवळपास दुप्पट आहे.  कार्य आधारीत शिक्षण देणाऱ्या शाळा आणि आयएसओ प्रमाणित शाळांच्या संख्येतही गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे.

शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये राज्य शासनाने “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम” सुरु केला. एकही मूल शैक्षणिकदृष्टया अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मुलभूत क्षमता आणि शैक्षणिक पातळी ओळखण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणही घेण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विदयार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात ज्यामध्ये एक पायाभूत चाचणी आणि संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या असतात. विशेष म्हणजे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

कोणत्याही प्रदेशाची ओळख ही त्याच्या संस्कृतीवरुन निर्माण होते. महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा कायम पुढे राहावा, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शैक्षणिक सुविध जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी राज्याच्या शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे.

 ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पायाभूत चाचण्यांचे आयोजन. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या शिक्षणासाठीच्या मूलभूत क्षमता आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वेळीच प्राप्त व्हाव्यात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा हाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य उददेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयोगटानुसार मुलभूत क्षमता किती प्राप्त झालेल्या आहेत याची पडताळणी या पायाभूत चाचण्यांद्वारे होते. या चाचण्यांचे वैशिष्ट्य असे की केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक मूल्यमापन किंवा त्याने/तिने किती गुण मिळवले हे तपासून पाहणे हे या चाचण्यांचे उदि्दष्ट नाही तर विद्यार्थ्याला नेमके किती समजले आहे, त्याला कोणता भाग अजिबातच कळलेला नाही, एखाद्या विषयातला नेमका कोणता भाग मुलांना समजायला अवघड जातोय, कोणता भाग जास्त सुलभ करुन शिकवणे आवश्यक आहे, हे शिक्षकांना या पायाभूत चाचण्यांच्या मूल्यमापनातून कळावे हा उद्देश आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रगती

विवरण

2015-16

2016-17

(जानेवारी पर्यंत)

2017-18

(जानेवारी पर्यंत)

प्रगत शाळा

8,791

24,687

47,973

डिजिटल शाळा

11,228

27,686

63,458

कार्य आधारित शिक्षण देणाऱ्या शाळा

12,409

13,448

15,452

आयएसओ प्रमाणित शाळा

1,368

2,646

3,325

रचनावादाचा अवलंब करत असलेल्या शाळा

46,608

63,595

67,758

आवश्यकतेनुसार व मागणीनुसार शिक्षकांना देण्यात येणारे प्रशिक्षण

1,82,428

3,37,348

5,07,440

भाषा विषयात विदयार्थ्यांचे सरासरी साध्य (टक्के)

67.0

77.0

74.33

गणित विषयात विदयार्थ्यांचे सरासरी साध्य (टक्के)

68.0

71.0

74.33

 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे शैक्षणिक परिवर्तन होण्यास मदत – विनोद तावडे

शालेय शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे शैक्षणिक परिवर्तन होत आहे असे मला वाटते. राज्यातील प्रत्येक मूल प्रगत झालं पाहिजे, प्रगत होत जाणारं प्रत्येक मूल अप्रत्यक्षपणे राज्य आणि देशालाही विकसित आणि मजबूत बनवणार आहे असे मला वाटते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत हाच संदेश शिक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे. शिक्षकांना सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, त्यांच्या चांगल्या कामाचे आवर्जून कौतुक करणे ही नवीन पद्धत ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाने रुढ केली आहे. प्रत्येक मूल शिकावे आणि शाळा प्रगत व्हावी, हे या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे ध्येय आहे, हे ध्येय कसे गाठायचे याचे स्वातंत्र्य अर्थातच शिक्षकांना देण्यात आले आहे. पारंपरिक शिक्षणपध्दतीच्या तुलनेत ज्ञानरचनावादी शिक्षणपध्दती ही निश्चितच अधिक परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे.

Best Reader's Review