कोम, सिंधू यांची ‘पद्म’साठी शिफारस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 12-09-2019 | 09:35:31 pm
  • 5 comments

कोम, सिंधू यांची ‘पद्म’साठी शिफारस

क्रीडा मंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांसाठी नऊ महिला खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच सर्व महिलांचा खेळाडूंची शिफारस केली आहे. त्यात बॉक्‍सिंगमध्ये सहा वेळा विश्‍वविजेती असणाऱ्या एमसी मेरी कोमची पद्मविभूषणसाठी तर फुलराणी पीव्ही सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे.

मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे.बॉक्‍सिंगमध्ये सहावेळा सलग विश्‍वविजेतेपद पटकावणारी आणि सलग सात स्पर्धात पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या नावाची शिफारस पद्मविभूषण या द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी केली आहे. या पुरस्कारासाठी शिफारस झालेली ती पहिलीच महिला खेळाडू आहे. या पुर्वी हा पुरस्कार बुध्दीबळाचा जग्गजेता विश्‍वनाथन आनंद (2007), सचिन तेंडूलकर, गिर्यारोहक सर एडमंड हिलरी (2008) या खेळाडूंना मिळाला आहे. कोमला 2008मध्ये पद्मश्री, तर 2013मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला होता. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या बेसिलमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. हैदराबादच्या या सुवर्णकन्येला 2015 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
याशिवाय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पैलवान विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू  मनिका बत्रा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, नेमबाज सुमा शिरुर, गिर्यारोहक ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणींची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Best Reader's Review