पश्चिम आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत साक्षी चितलांगेला सुवर्णपदक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 12-09-2019 | 03:16:31 pm
  • 5 comments

पश्चिम आशियाई ज्युनियर बुद्धिबळ

स्पर्धेत साक्षी चितलांगेला सुवर्णपदक

साक्षीने मिळविला वुमन ग्रँड मास्टरचा नाॅर्म !

   औरंगाबाद :दिल्ली येथे झालेल्या वेस्टर्न एशियन गर्ल्स ज्युनियर चेस चाम्पियनशिप मध्ये औरंगाबादची शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी दिनेश चितलांगेने पहिला क्रमांक मिळवित भारताला सुवर्णपदक मिळवुन दिले. साक्षीने ७ गुण मिळवित सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले. हे साक्षीचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ९ वे पदक आहे. या यशाबद्दल साक्षीला सुवर्ण पदक देउन सन्मानित करण्यात आले.   

   या स्पर्धेत दहा देशातील खेळाडूंनी भाग घेतला. गेल्या वर्षी जुनियर गर्ल्स  चेस चॅम्पियन बनल्या बद्दल साक्षीची भारतातर्फे या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आठव्या फेरीनंतर बाकी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा साक्षी, बखोरा ए (Bakhora Abdusattorova) ने दीड   व वंतिकाने १ गुणांची आघाडी घेत पोडियमवर पहिल्या तीन मध्ये आपले स्थान जवळ जवळ निश्चित केले. शेवटच्या फेरीपुर्वी साक्षी व उजबेगिस्तानची बखोरा ए. दोन्ही 6.5 गुणासह संयुक्त आघाडीवर होत्या. शेवटच्या फेरीत सविता बी. सोबत  बरोबरी साधत साक्षीने सुवर्ण पदक मिळविले तर उजबेगिस्तानच्या बखोराला शेवटच्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्याबद्दल साक्षीला वूमन ग्रँड मास्टरचे नाॅर्म प्रदान करण्यात आले. हे साक्षीचे पहिले वुमन ग्रँड मास्टर नाॅर्म आहे.या स्पर्धेत साक्षीने १६ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केली. 

   साक्षीने ९ पैकी ७ गुण प्राप्त करीत सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले. साक्षीला ह्या स्पर्धेत मुख्यतः उजबेगिस्तानच्या वुमन इंटरनॅशनल मास्टर बखोरा ए व वुमन इंटरनॅशनल मास्टर वंतिका अग्रवालचे आव्हान होते. पहिल्या दोन डावात दीड गुण मिळवल्यावर तिसऱ्या व चौथ्या डावात एकाच दिवशी वुमन इंटरनॅशनल मास्टर आकांक्षा हगवणे (आंतरराष्ट्रीय रेटींग 2232) व वंतिका अग्रवाल ( रेटींग 2304 ) दोघींचा पुर्ण डावात  कोणतीही संधी न देता सहज पराभव केला. पाचव्या डावात साक्षीला उजबेगिस्तानच्या वुमन इंटरनॅशनल मास्टर  बखोरा कडून ओपनिंग मध्ये केलेल्या चुकीमुळे अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. नंतर साक्षी ने सलग तीन विजय मिळवित बखोरा सोबत संयुक्त आघाडी घेतली. शेवटच्या ९ व्या फेरीत सविता श्री बरोबर डाव बरोबरीत सोडवून साक्षीने चम्पिययनशिप जिंकली.आतापर्यंत साक्षीने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या ९ पदकात ३ सुवर्ण,४रौप्य व २ ब्राॅन्झ पदकाचा समावेश आहे. कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत तर साक्षीने सतत चार वर्षं सलग पदक मिळवले आहे. साक्षीने राष्ट्रीय स्तरावर ११ पदक मिळवले तर राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अनेक पदक मिळविली आहेत.साक्षीने गेल्या वर्षी राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेची चाम्पिययनशिप मिळविल्याबद्दल साक्षी दिल्ली येथे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या जागतिक ज्युनिअर मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 

 

Best Reader's Review