Breaking News

पाटोद्याच्या राहुलला सुवर्णपदक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 13-04-2018 | 02:42:55 am
  • 5 comments

पाटोद्याच्या राहुलला सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा : कुस्ती क्रीडाप्रकारांत भारताची दणदणीत सुरुवात

गोल्ड कोस्ट – अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार आणि युवा कुस्तीगीर राहुल आवारे यांनी आपापल्या गटांत सुवर्णपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सलग आठव्या दिवशी भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्यामुळे स्पर्धेतील प्रत्येक दिवशी किमान एक सुवर्णपदक जिंकण्याची भारताची परंपरा कायम राहिली आहे. मात्र भारताच्या बबीता फोगटला महिलांच्या कुस्तीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताच्या राहुल आवारेने पुरुषांच्या 57 किलो गटांतील अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्ह ताकाहाशीचा प्रतिकार 15-7 अशा गुणफरकाने संपुष्टात आणताना भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. एक वेळ 6-7 असा पिछाडीवर असतानाही राहुलने झुंजार पुनरागमन करीत आघाडी घेतली. त्यानंतर लढत संपण्यास सुमारे एक मिनिट बाकी असताना राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. परंतु वेदना होत असतानाही लढत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेत राहुलने सुवर्णपदकाची कमाई केली.

राहुलने त्याआधी इंग्लंडचा जॉर्ज रॅम, ऑस्ट्रेलियाचा थॉमस चिच्चिनी आणि पाकिस्तानचा मुहम्मद बिलाल यांच्यावर चमकदार विजय मिळविताना अंतिम फेरी गाठली होती. गेल्या 10 वर्षांपासून मी या क्षणाची वाट पाहात होतो. त्यामुळे या सर्वोच्च यशाचे वर्णन करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत, असे सांगून राहुल म्हणाला की, 2012 मध्ये निधन झालेल्या माझ्या गुरूंना मी हे पदक अर्पण करतो. मी सुवर्णपदक जिंकावे हे त्यांचेच स्वप्न होते.

त्यानंतर सुशील कुमारने पुरुषांच्या 74 किलो गटांतील अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहानस बोथाचे आव्हान एक मिनिट 20 सेकंदांत तांत्रिक वर्चस्वाच्या आधारावर मोडून काढत दुसऱ्या सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. विशेष म्हणजे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुशील कुमारचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले. मला सुवर्णपदक जिंकण्याचा विश्‍वास होता, असे सांगून सुशील म्हणाला की, माझ्या खडतर परिश्रमांचे हे फळ आहे. सुशीलने कॅनडाचा जेव्हन बालफोर आणि पाकिस्तानचा मुहम्मद असाद बट्ट यांना पराभूत केल्यानंतर उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॉनोर इव्हान्सला धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती.

  बबीता फोगटला अखेर रौप्यपदक

भारताच्या गतविजेत्या बबीता फोगटला महिलांच्या 53 किलो गटांत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बबीताने 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर ग्लासगो-2014 स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत आपल्याबद्दलच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु कॅनडाच्या डायना वेईकरविरुद्ध मोक्‍याच्या क्षणी आक्रमक पवित्रा घेण्यात अपयशी ठरल्यामुळे तिला 2-5 असा पराभव पत्करावा लागला. आक्रमणात कमी पडल्यानेच मी पराभूत झाले, असे सांगून बबीता म्हणाली की, विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे मला समाधान आहे. परंतु मला हवा होता तसा निकाल मात्र मिळालेला नाही. गुडघ्याच्या दुखापतीने मला त्रास दिला. मात्र दुखापती हा खेळाडूंसाठी अलंकारच असतो. त्यामुळे पराभवासाठी दुखापतीची सबब मी देणार नाही.

   कॅनडाची चौथ्या क्रमांकावर धडक

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आता 14 सुवर्णपदकासह, 6 रौप्य व 9 कांस्य अशा एकूण 29 पदकांची कमाई केली असून पदकतालिकेत तिसरा क्रमांक राखला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया 59 सुवर्णांसह एकूण 147 पदके पटकावून अव्वल स्थानावर असून इंग्लंड 26 सुवर्णासह 79 पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कॅनडाने 10 सुवर्णांसह 54 पदके जिंकून चौथ्या क्रमांकावकर धडक मारली. त्यामुळे न्यूझीलंड (9 सुवर्णांसह 27 पदके) आणि दक्षिण आफ्रिका (9 सुवर्णांसह 21 पदके) यांची पदकतालिकेत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर घसरण झाली. स्कॉटलंड (7 सुवर्णांसह 34 पदके), वेल्स (7 सुवर्णांसह 24 पदके), सायप्रस (6 सुवर्णांसह 8 पदके) आणि जमैका (4 सुवर्णांसह 13 पदके) यांनी गुणतलिकेतील पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.

भारताची घोडदौड कायम

श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारांत, हीना सिधूने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारांत, तर मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच जितू रायने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत, तर महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारांत मेहुली घोषने रौप्यपदक, तसेच अपूर्वी चांडेलाने कांस्यपदक जिंकून भारताला तिहेरी यश मिळवून दिले होते. मात्र विद्यमान राष्ट्रकुल विजेत्या परदीप सिंगला पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमधील 105 किलो वजनगटांत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

तसेच गतविजेत्या सतीशकुमार शिवलिंगमने पुरुषांच्या 77 किलो गटांत, तसेच वेंकट राहुल रगालाने पुरुषांच्या 85 किलो गटांत सुवर्णाची कमाई केली. त्यानंतर पूनम यादवने महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील 69 किलो गटांत आणि महिला टेबल टेनिस संघाने सोनेरी यश मिळवीत भारताच्या खात्यात एकाच दिवशी तीन सुवर्णांची भर घातली होती. तत्पूर्वी साईखोम मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजन गटांत राष्ट्रकुल आणि स्पर्धाविक्रमाचीही नोंद करताना पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली होती. पी. गुरुराजा याने पुरुषांच्या 56 किलो वजन गटांत रौप्यपदकाची कमाई करताना भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिल्यावर दुसऱ्या दिवशी खुमुकचाम संजिता देवी हिने महिलांच्या 53 किलो वजनगटांत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

Best Reader's Review