Breaking News

गुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 18-03-2018 | 05:47:46 pm
  • 5 comments

गुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मराठी नववर्षाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. समृद्धी, विजय आणि सामाजिक संदेशांची किनार यांचे प्रतीक असलेल्या गुढीची उभारणी आज प्रत्येक मराठी घरा-घरात केली जात आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रांगोळ्यांची कलाकुसर, विविध ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या गोष्टींची प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे काहीसे या शोभायात्रांचे स्वरूप असणार आहे. हजारोंच्या संख्येने तरुण-वयस्कर मंडळी यात उत्साहाने सहभागी होतात. गिरगाव येथे नववर्ष दिंडी सोहळा, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे नववर्ष स्वागतयात्रा आणि चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांच्या उत्साहात गुढी उभारली जात आहे.

Best Reader's Review