Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 14-04-2017 | 01:18:50 am
  • 5 comments

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता

‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार

महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय, राजकुमार बडोलेंच्या प्रयत्नांना यश

मुंबई :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘ज्ञान दिवस’ म्हणून राज्यभर थाटामाटात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षांची आंबेडकरी अनुयायांची मागणी आज पूर्ण झाल्याबद्दल खूप समाधान वाटत असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विविध विषयांचा मोठा व्यासंग होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी परदेशात जाऊन सखोल अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम. एस. सी. ची पदवी मिळविली होती. ग्रेज इन (लंडन) या संस्थेतून त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ ची पदवी तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन येथून डी. एस.सी (इकॉनॉमिक्स) ची पदवी संपादन केली. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाचा, प्रज्ञेचा झराच होता. त्यामुळे शासनाने त्यांची जयंती हा ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे, असेही श्री. बडोले म्हणाले.

न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना एल. एल. डी. पदवी प्रदान केली तर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. त्यांची ग्रंथसंपदा, विविध विषयांवर लिहिलेले महत्वाचे ग्रंथ, साप्ताहिके, पाक्षिके, दैनिके यातून केलेले लेखन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय कार्ये असे उत्तुंग कार्य पाहता त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख पटते. त्यामुळेच त्यांच्या प्रज्ञेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी देशाला महान लोकशाही संविधान देऊन विभाजित समाजाला एका समानतेच्या धाग्यात बांधले. त्यांच्या दूरदर्शीपणामुळेच आज देशाची प्रगती होत आहे. महाराष्ट्र राज्याने त्यांच्या जयंतीदिनी ज्ञान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्यांना मानवंदना दिली आहे, अशा शब्दात श्री. बडोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन

ज्ञान दिवस हा खऱ्या अर्थाने ज्ञान दिवस वाटावा यासाठी तसे नियोजनच करण्यात आल्याचे श्री. बडोले म्हणाले. ते म्हणाले की, ज्ञान दिवस म्हणून दरवर्षी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ज्ञान दिवसाच्या आयोजनाचा उद्देश विशद करण्यात येईल. त्यांनी अभ्यासलेले अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र आदी विषयांवरील त्यांच्या ग्रंथसंपदेची माहिती देण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात येईल. ज्ञान दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन संबंधित जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त हे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचेही श्री. बडोले यांनी सांगितले.

Best Reader's Review