Breaking News

संपूर्ण देशामध्ये  पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 25-03-2020 | 12:57:18 am
  • 5 comments

संपूर्ण देशामध्ये  पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

  • आरोग्याच्या  पायाभूत सुविधेसाठी  १५ हजार  कोटी रुपयांची तरतूद 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका
  • २१ दिवसांचा लॉकडाऊन काळ 
  • घराच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन होणार नाही 
  • जान है तो जहान है हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे
  • घरातच राहायचे आहे, सोशल डिस्टन्सिंग 

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अपयशी ठरलो तर देश २१ वर्ष मागे जाईल. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. त्यामुळे नागरिकांनी पुढील २१ दिवसांसाठी घरातून बाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. या काळात अनेकांच्या रोजगारावर गदाही येईल. मात्र, 'जान है तो, जहान है..' हे लक्षात ठेवा, असा सल्ला मोदींनी नागरिकांना दिला.

तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.  

कोरोना व्हायरसशी लढा देत असताना आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत येत्या काळासाठी आणि आरोग्यसेवांसाठी पंतप्रधानांनी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जाहीर केलं. कोरोनाची चाचणी प्रक्रिया, पीपीई, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर या सर्व सुविधांसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. तर, वैद्यकिय क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीसुद्धा हा निधी वापरला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.   

यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इटलीतील आरोग्य व्यवस्थेचाही दाखला दिला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या आजाराने बाधित असलेली एक व्यक्ती, नीट ऐका केवळ एक व्यक्ती आठवडाभरात- दहा दिवसात शेकडो लोकांपर्यत हा आजार पसरवते. म्हणजेच हा रोग एखाद्या वणव्याप्रमाणे पसरत जातो. जागतिक आरोग्य संघटनेची आणखी एक आकडेवारी आहे. अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो जगभरात कोरोना विषाणूची सर्वप्रथम एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस लागले. म्हणजेच एक लाख लोकांपर्यंत पोहोचायला 67 दिवस, त्यानंतर केवळ 11 दिवस, केवळ 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे दोन लाख लोकांना. जरा विचार करा पहिल्या एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस आणि त्यानंतर ही संख्या दोन लाख व्हायला केवळ 11 दिवस. त्यानंतर ही बाब आणखी भयावह आहे की दोन लाख लोकांपासून तीन लाख लोकांपर्यंत या रोगाचा फैलाव व्हायला केवळ चार दिवस लागले. तुम्ही कल्पना करू शकता की कोरोना विषाणूचा फैलाव किती झपाट्याने होऊ शकतो आणि जेव्हा याचा फैलाव होऊ लागतो तेव्हा त्याला आवर घालणं अतिशय अवघड होतं. मित्रांनो, याच कारणामुळे चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण सारख्या अनेक देशामध्ये ज्यावेळी कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि हे देखील लक्षात ठेवा इटली असो किंवा अमेरिका, त्यांची आरोग्य सेवा, त्यांची रुग्णालये, त्यांची अत्याधुनिक संसाधने, संपूर्ण जगभरात सर्वोत्तम आहेत. त्यांची व्यवस्था सर्वोत्तम मानली जाते. असे असूनही या देशांना कोरोनाचा प्रभाव कमी करता आला नाही. या परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की या परिस्थितीमध्ये आशेचा किरण कुठे आहे? उपाय काय आहे? कोणता पर्याय आहे? कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आशेचा किरण हा आहे की ज्या देशांनी या संकटाला तोंड दिले आहे त्यांच्याकडून मिळालेला अनुभव. म्हणजे ज्या देशांनी या संक्रमणावर नियंत्रण मिळवले. अनेक आठवडे या देशातील नागरिक घराबाहेर पडले नाहीत.

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते.

असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.  

Best Reader's Review