Breaking News

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-03-2020 | 11:40:04 pm
  • 5 comments

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक

अंतर राखणे अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुद्रित प्रसारमाध्यमांच्या 20 पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि हितसंबंधी व्यक्तींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमातल्या अकरा विविध भाषांमधल्या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी 16 विविध ठिकाणांहून या संवादात सहभागी झाले होते.

देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माहिती पोहचवण्यात प्रसारमाध्यमे बजावत असलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे,असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. प्रसारमाध्यमांचे जाळे देशभर पसरले असून, ते सर्व शहरे आणि गावात देखील पोहोचले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच, कोरोनाच्या आव्हानाचा सामना करताना, प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून, अगदी तळागाळापर्यंत ते यासंदर्भातली अचूक माहिती पोचवू शकतात, असं पंतप्रधान म्हणाले. 

वृत्तपत्रांची विश्वासार्हता मोठी असून, स्थानिक बातम्यांची पाने त्या त्या प्रदेशात खूप वाचली जातात. त्यामुळे, या पानांवर कोरोनाविषयी जनजागृती करणारी माहिती, लेख प्रकशित केले जावेत, असे मोदी म्हणाले. कोरोनाची तपासणी केंडे कुठे आहेत, याची चाचणी नेमकी कोणी करावी, चाचणी करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा, घरात विलगीकरण सांगितले असल्यास, कोणती काळजी घ्यावी, ही माहिती लोकांपर्यंत पोहचवणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती वृत्तपत्रांनी मुद्रित आणि ऑनलाईन आवृत्यांमधून प्रसिद्ध करावी, असे मोदी म्हणाले. जमावाबंदी/संचारबंदी सारख्या नियमनाच्या काळात, अत्यावर्ष्य्क वस्तू कुठे मिळतील, त्या ठिकाणांची सविस्तर माहिती देखील वृत्तपत्रांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रसारमाध्यमांनी सरकार आणि जनता यांच्यातला दुवा बनावे आणि जनतेच्या प्रतिसादाच्या बातम्या त्वरित स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.सामाजिक अंतर राखण्याचे महत्व अधोरेखित करतांनाच, त्यांनी माध्यमांनाही त्याविषयी जागृती करण्यास सांगितले. राज्यांनी घातलेल्या बंदी आणि नियमांविषयी माहिती द्यावी, तसेच, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना, आंतरराष्ट्रीय पातळीवरची आकडेवारी आणि केसेसची माहिती वाचकांना द्यावी, असे पंतप्रधान म्हणाले.

या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेमधील लढावू वृत्ती कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगतांनाचा, लोकांमध्ये भीती, निराशा आणि नकारात्मक भावना निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. अफवांचा प्रसार रोखण्यातही प्रसारामाध्यमांनी मदत करावी असे ते म्हणाले. सरकार कोविड-19 चा मुकाबला करुन, या संकटावर मात करण्यासाठी कटिबद्ध आहे, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे, असे त्यांनी सांगितले.

अशा संकटकाळात सर्वांशी संवाद साधणे आणि सक्षमपणे देशाचे नेतृत्व करत असल्याबद्दल पत्रकारांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून जनतेपर्यंत योग्य माहिती पोहचवली जाईल, असे या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषतः कोरोनाविषयीच्या  सकारात्मक बातम्यांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाईल. असेही ते म्हणाले. मुद्रित प्रसारमाध्यामांची विश्वासार्हता अधोरेखित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता, अशी आठवण देखील या प्रतिनिधींनी दिली.

या प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आणि वंचित वर्गांविषयी प्रसारमाध्यमांची विशेष जबाबदारी असल्याचे स्मरण त्यांनी करुन दिले.अशा संकटांवर मात करुन समाज सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक एकजिनसीपणा अत्यंत महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या आजाराचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती, देशापर्यंत पोहचवून, समाजात भीती आणि अफवा पसरणार नाही, याची काळजी घेतल्याबद्दल, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि या खात्याचे सचिव यांनीही यावेळी या संवादात भाग घेतला

Best Reader's Review