Breaking News

भारतीय अर्थव्यवस्थेत गतीने विकास करण्याची क्षमता : बिल गेट्स

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 17-11-2019 | 11:02:55 pm
  • 5 comments

भारतीय अर्थव्यवस्थेत गतीने

विकास करण्याची क्षमता : बिल गेट्स

नवी दिल्ली : जगातील श्रीमंतांच्या यादीतील अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनतेची गरीबी दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यासाठी सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे.', असे ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी भारतातील आधार कार्ड प्रणाली, वित्तीय सेवा, फार्मा कंपन्या आदींबद्दल विशेष कौतूक केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट दिसून आले होते. त्यानंतर आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. बिल गेट्स म्हणाले, "मला सद्यस्थितीबद्दल काही माहिती नाही मात्र, येणारे दशक भारताचे असेल. या दरम्यान भारताची अर्थव्यवस्था तेजीत असेल, विकास करेल. वास्तविकतः या काळात अर्थव्यवस्था भरारी घेईल. "

'आधार'चे बिल गेट्सकडून कौतूक !

'भारताचे जागतिक पटलावर एक महत्व आहे. येथे बऱ्याच नाविण्यपूर्ण गोष्टी आहेत. देशातील 'आधार' आणि 'युपीआय'च्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो आणि व्यापक स्वरूपात नागरिकांनी याचा स्वीकार केला आहे. याचा आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळेल.', असे बिल गेट्स म्हणाले.

नंदन नीलेकणी यांच्यासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि 'आधार'चे शिल्पकार नंदन नीलेकणी यांचे कौतूक करताना बिल गेट्स म्हणाले, "मी नंदन नीलेकणी यांसारख्या व्यक्तीचे सहकार्य घेऊ इच्छितो. भारतात डिजिटल ओळखीच्या माध्यमातून वित्तीय सेवांचे आदान प्रदान केले जाते. मी ही गोष्ट शिकू इच्छूतो. जेणेकरून याचा उपयोग मी इतर देशांमध्ये करू शकेन. जेव्हा जागतिक पातळीवर भारताचा विचार केला जातो तेव्हा अन्य क्षेत्रांपेक्षा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो."

ठरले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

११० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह बिल गेट्स पुन्हा जागतिक श्रीमंतांच्या क्रमावारीत अव्वल ठरले आहेत. शुक्रवारी त्यांनी एमेझोनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकत पहिला स्थान पटकावले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७.८९ लाख कोटी रुपये इतकी आहे. जगातील दारिद्र दूर करण्यासाठी त्यांनी आजवर बिल-मेलेडो फाऊंडेशनसहीत ३५ अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती दान केली आहे.

बिल गेट्‌स कडून बिहार सरकारचे कौतुक

दारिद्य्र व रोगराई निर्मुलानासाठी गेली 20 वर्षे चांगले प्रयत्न
पाटणा :  बिहार सरकारने गेली 20 वर्षे दारिद्य्र व रोगराईच्या निमुर्लनासाठी चांगले प्रयत्न केले असे कौतुगोद्‌गार मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांनी काढले आहेत. या प्रयत्नांमुळे फारच थोडा भाग सुधारला पण त्यांचे हे प्रयत्न चांगले होते असे त्यांनी म्हटले आहे. सध्या बिल गेट्‌स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा या बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आमचे फौंडेशन बिहार मधील गरीब मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी काम करेल त्यासाठी आम्हाला सरकारचीही मदत लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. या राज्यातील सर्वच मुले आरोग्यदायी वातावरणात चांगले शिक्षण घेऊ शकतील ही आमची जबाबदारी आहे आणि त्या कामी आम्हाला राज्य सरकारही मदत करेल असा विश्‍वास गेट्‌स यांनी व्यक्त केला.

या फौंडेशनच्या मदतीने आम्ही येथे चांगले काम करू, त्यांनी आम्हाला जो मदतीचा हात दिला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री व बिल गेट्‌स यांच्यात बिहार मध्ये चांगली आरोग्य सेवा व शिक्षणाच्या सोयी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बिहार सरकारने वातावरणातील बदलाच्या विरोधात जल-जीवन-हरियाली हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची माहितीही नितीशकुमार यांनी त्यांना दिली आहे.

Best Reader's Review