सरकारचे 100 दिवस हे विश्‍वास आणि विकासाचे : मोदी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 10:47:50 pm
  • 5 comments

सरकारचे 100 दिवस हे विश्‍वास आणि विकासाचे : मोदी

रोहतक : भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे 100 दिवस हे विश्‍वास आणि विकासाचे होते.या काळात देशात मोठे बदल घडले गेले. देश कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे, हे देशाने आणि जगाने या काळात पाहिले, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, जम्मू काश्‍मीर आणि लडाखचा मुद्दा असो अथवा पाणी टंचाईचा असो… प्रत्येक आव्हानाला थेट कसे भिडायचे हे आम्हाला माहीत आहे. देशातील 130 कोटी जनतेने नवीन उत्तरे शोधण्यास सुरवात केली आहे. जम्मू काश्‍मीर आणि लडाखमधील नागरिकांच्या आशा आकांक्षांच्या परिपुर्तीसाठी नव्या दिशेने कार्यरत झालो आहोत.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे 100 दिवस हे विश्‍वास आणि विकासाचे होते. तसेच हे दिवस ठामपणा, निर्धार, प्रगती आणि सद्‌हेतूचे होते जनतेचा पाठींबा आणि विश्‍वासाच्या जोरावर देशाचे संरक्षण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेतले. या काळात दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी महत्त्वाचे कायदे केले. मुस्लीम भगिनींच्या हक्कासाठी कायदे केले. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी राजमार्ग प्रशस्त केला. बॅंकिंग क्षेत्राशी महत्वाचे निर्णय घेतले. भविष्यात त्याचे चांगले परिणाम निश्‍चीतच दिसतील

Best Reader's Review