१०० दिवसांत ऐतिहासिक निर्णय -प्रकाश जावडेकर 

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 08:40:49 pm
  • 5 comments

१०० दिवसांत ऐतिहासिक निर्णय -प्रकाश जावडेकर 

दिल्ली :पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या कार्यकालातील पहिल्या १००दिवसांत ऐतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली. जम्मू कश्मीर आणि लडाख संदर्भात घेतलेला निर्णय इतिहास घडविणारा आहे. 

केंद्रात मोदी सरकारला १००दिवस पूर्ण झाले . या सरकारची उपलब्धी त्यांनी देशासमोर ठेवली.पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले,जम्मू कश्मीरमधून  घटनेचे कलम ३७० और कलम  ३५ अ हटविणे हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.आता देशभरात लागू असलेल्या योजनांचा लाभ या राज्यातील जनतेला मिळणार आहे. 

प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले , पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांचे   दरवाजे वाजविले परंतु साऱ्या देशांनी भारताबरोबर राहणे पसंत केले.तीन तलाक पीड़ित महिलांना सामाजिक न्याय मिळाला. ही खूप जुनी मागणी होती ती आता कुठे पूर्ण झाली आहे. 

गेल्या ७० वर्षांपासून जम्मू काश्मीरची नाळ देशापासून वेगळी झाली होती. त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सर्व नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये काही मोजक्याच जागा आहेत ज्या ठिकाणी कलम १४४ लागू आहे, असे जावेडकर यावेळी म्हणाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने जगभरात सर्वत्र मदत मागितली. परंतु संपूर्ण जग हे भारताच्या बाजूने उभे राहिले आणि हे सरकारचे सर्वात मोठे यश आहे, असंही ते म्हणाले. तिहेरी तलाक, पॉक्सो, समान वेतन देण्याचा निर्णय, ४० कोटी असंघटीत कामगार, ६ कोटी छोटे व्यापारी आणि १४ कोटी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना हे सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आहेत.

जलशक्ती मंत्रालयाची स्थापना

पाण्याचे स्रोत, पाणी साठवण आणि पाणी संकलन, पाणी बचत आणि पाण्याचा वापर सुनिश्चित करणे हे पाण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आजही लाखो महिलांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. आता जेव्हा त्यांना घरात पाणीही मिळेल, गॅस देखील मिळेल, त्यानंतर महिला सबलीकरणाला चालना मिळेल. या संदर्भात १.५७ लाख कामे झाली असून २.११ लाख कामे करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.

 

कामांमध्ये पारदर्शकता

देशहिताचे निर्णय, देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्मय़, सामाजिक न्यायाचे निर्णय, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, आदिवासी बांधवांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, सर्व समाजातील नागरिकांना सुरक्षा कवच पुरवणारे महत्त्वाचे निर्णय, सरकारी कामांमध्ये पारदर्शकता असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय, बेकायदेशीर कृत्य थांबवण्यासाठी घेतलेले निर्णय, तसंच ५ लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्याचा भरवसा असल्यामुळेच सरकारने याची आधीपासूनच तयारी केली होती, असंही ते यावेळी म्हणाले.

एका दिवसात कंपनी सुरू करण्याची सुविधा

२०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील ११ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. परंतु २०१९ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. आता आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या पाच वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर १०० लाख कोटी रूपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत एका दिवसात कंपनी सुरू करण्याची सुविधा देण्यात येत असून हे पहिल्यांदाच करण्यात आले आहे. जीएसटी आणि आयकरात योग्य ते बदल करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


रोज ८० लाख गॅस जोडण्या

प्रत्येत घरांमध्ये वीज जोडणी पुरवण्याचे लक्ष्य सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर ६ कोटी लोकांनी आपल्या पैशाने गॅस जोडणी घेतली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये गॅस जोडणी घेतलेल्यांची संख्या १४ कोटी इतकी झाली आहे. अद्यापही गॅस जोडण्या देण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात १०० दिवसांमध्ये ८० लाख गॅस जोडण्या देण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

आयुषमान भारतला यश

आयुषमान भारत योजनेअंतर्गत ४१ लाख रूग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. हेच या योजनेचे मोठे यश आहे. १६ हजार रूग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येत आहे. तसेच १० कोटी ई-कार्ड्स जारी करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त २० हजारांपेक्षा अधिक वेलनेस सेंटर तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून आजारांपासून वाचण्यासाठी उपाय सुचवण्यात येणार आहेत.

Best Reader's Review