जलियाँवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 04:42:49 pm
  • 5 comments

जलियाँवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण

नवी दिल्ली : जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता. भारताच्या इतिहासातील ही सर्वात दुःखद घटना ठरली असली तरी या घटनेने ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा क्रूर चेहरा जगासमोर आला. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या नागरिकांना स्मरण करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलियाँवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत, या हत्याकांडात शहीद झालेल्या पराक्रमी नागरिकांचे बलिदान कधीच विसरले जाणार नसल्याचे म्हटले. या वीरांचे स्मृतिस्थळ देशासाठी एक प्रेरणास्थान असून त्यांना अभिमान वाटेल असा भारत घडविण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहील, असेही ते म्हणाले.

 

छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष झाल्यानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चंदीगड क्षेत्रीय आऊटरिच ब्युरोने ११ ते १३ एप्रिल दरम्यान छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘स्वातंत्र्यलढ्यावरचे छायाचित्र प्रदर्शन’ या नावाच्या या प्रदर्शनात जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीची चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, लेख यांचा समावेश आहे. १३ एप्रिल १९१९ मध्ये मारल्या गेलेल्या या लोकांच्या स्मरणार्थ स्मारक निर्मितीसाठी जमीन दान करण्याचे अवाहन महात्मा गांधी आणि अन्यजण करत आहेत हे दर्शविणाऱ्या छायाचित्राचाही यात समावेश आहे.

Best Reader's Review