Breaking News

विजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 24-10-2018 | 01:12:39 am
  • 5 comments

विजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजयुमो ही भाजपची बलशाली भुजा असून पक्षाने निर्धारित केलेल्या ‘विजयलक्ष्य-२०१९’ करिता भाजयुमो पूर्णतः सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांनी केले. भाजयुमोचे राष्ट्रीय युवा महाअधिवेशन दि. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हैद्राबाद येथे होत आहे. या महाअधिवेशनाची माहिती देण्यासाठी नवी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पूनम महाजन बोलत होत्या.

हैद्राबाद येथील परेड ग्राउंड येथे  २६ ऑक्टोबरची दुपार ते दि. २८ ऑक्टोबरची संध्याकाळ अशा कालावधीत भाजयुमोचे हे राष्ट्रीय अधिवेशन होत असून दक्षिण भारतात होत असलेले भाजयुमोचे पहिलेच अधिवेशन आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या व काही अन्य महत्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची युवा शाखा भाजयुमोचे हे महाअधिवेशन महत्वाचे मानले जात आहे. या पत्रकार परिषदेत खा. पूनम महाजन यांनी सर्वप्रथम भाजयुमोने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाबाबत माहिती दिली. तसेच, भाजयुमोच्या ४० वर्षांच्या परंपरेचा व आजवर या संघटनेला लाभलेल्या नेतृत्वांचाही त्यांनी उल्लेख केला. केवळ राजकीय संघटन म्हणून काम न करता त्यत पलीकडे जाऊन या राजकीय व्यवस्थेकडून देशातील युवकांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असून त्याकरिता संपूर्ण देशात विविध भागात पोहोचून आम्ही युवकांशी संवाद साधल्याचे महाजन यावेळी म्हणाल्या.

महाअधिवेशन घेण्याची जबाबदारी मिळणे, ही युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून सौभाग्याची गोष्ट असल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, या अधिवेशनाला युवा मोर्चाचे देशभरातील मंडल स्तरावरील सुमारे ७ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असून संघटनेसाठी ही संख्या ऐतिहासिक ठरणार आहे. या अधिवेशनात एक राजकीय ठरावदेखील मांडण्यात येणार असून २०१९ मधील विजय लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने यावेळी विचारमंथन करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार असून समारोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह मार्गदर्शनाने होईल. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वानंद सोनोवाल, विप्लव देव, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह भाजप व भाजयुमोचे अनेक ज्येष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, अधिवेशनाच्या समारोपानंतर त्याच मैदानात भाजयुमोच्या सुमारे २ लाख कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार असल्याचीही माहिती पूनम महाजन यांनी यावेळी दिली.

 

भाजयुमो महाधिवेशन : एक दृष्टीक्षेप

>उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तर समारोप भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणाने होणार

>भाजयुमोचे दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन

>संपूर्णपणे पेपरलेस आणि डिजिटल अधिवेशन, सदस्य नोंदणीदेखील ऑनलाईन करणार

>प्रदेश स्तरावरील संघटनात्मक कार्यक्रमांच्या माहितीसाठी प्रत्येकाला स्वतंत्र डिजिटल प्रदर्शनी

>‘विविधतेत एकता’ दर्शवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आपापल्या राज्यांतील पारंपारिक पोशाखांत येणार

Best Reader's Review