Breaking News

अटलबिहारी वाजपेयी...एक पर्व !

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:25:38 am
  • 5 comments

अटलबिहारी वाजपेयी...एक पर्व !

आपल्या बुलंद आवाजाने असंख्य जाहीर सभा गाजविणारे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही प्रथमच भारतीय राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. 

 

आपल्या बुलंद आवाजाने असंख्य जाहीर सभा गाजविणारे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही प्रथमच भारतीय राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या खंबीर नेतृत्वाला मनापासून दाद दिली आहे. १९९० च्या दशकात वाजपेयी हेच भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू होते. किंबहुना भारतीय राजकारण वाजपेयी यांच्याच सभोवताली केंद्रित झाले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९९० च्या दशकात अर्थातच पी. व्ही. नरसिंहराव सरकारची कारकीर्द संपल्यानंतर भाजपाला केंद्रीय राजकारणात मोठे करण्यात ज्या नेत्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यात वाजपेयी आघाडीवर होते. विशेषत: १९९१ मध्ये बाबरी ढाचाचा विध्वंस झाल्यानंतर भाजप सर्वच राजकीय पक्षांकरिता अस्पृश्य झाला असताना, भाजपसोबत नवे मित्रपक्ष जोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना करण्यातही वाजपेयीच आघाडीवर होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि ठोस व धडक पावले उचलण्याची क्षमता यासाठी ते देशातच नव्हे, तर विदेशातही विशेष लोकप्रिय आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बसने पाक दौरा केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर वाजपेयी यांच्या उंचीचा नेता भारताला यापूर्वी कदाचितच मिळाला असावा, अशी प्रतिक्रिया देश-विदेशातून उमटल्या आहेत.

 

नेहरू-गांधी घराण्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदी संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ विराजमान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते आहेत. भाजपाचा मवाळ चेहरा म्हणून वाजपेयी ओळखले जात. त्यांचे विरोधक त्यांचे वर्णन ‘रा. स्व. संघाचा मुखवटा’ या शब्दात करायचे. तब्बल चार दशके विरोधी बाकांवर बसल्यानंतर १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तथापि, त्यांची ही कारकीर्द केवळ १३ दिवसांचीच राहिली होती. संख्याबळाच्या अभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या सरकारची दुसरी कारकीर्द १३ महिन्यांची होती. यावेळीही संख्याबळ हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी रालोआतून आपला पक्ष माघारी घेतला आणि वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला होता. १९९९ च्या निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आणि वाजपेयी यांची पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली. या सरकारने आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

 

अल्पवयीन असतानाच वाजपेयी यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात आवाज उठविला. त्यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. १९५० च्या सुरुवातीच्या काळात रा. स्व. संघाच्या मासिकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी विधि अभ्यासक्रमही अर्ध्यावरच सोडला. तत्पूर्वी १९४२-४५ या काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच काळात त्यांचा संपर्क भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी आला आणि अल्पावधीतच ते श्यामाप्रसाद यांचे लाडके झाले.

Best Reader's Review