Breaking News

ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अग्रेसर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 04-08-2018 | 11:32:26 pm
  • 5 comments

ऊर्जा कार्यक्षमता सज्जता

निर्देशांकात महाराष्ट्र अग्रेसर

नवी दिल्ली : ऊर्जा बचत व कार्यक्षमता क्षेत्रात नवी नाम मुद्रा उमटवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य ठरले आहे.
 
देशात ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलत नीती आयोगाने प्रथमत:च राज्यांचा ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांक तयार केला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत ऊर्जा दक्षता ब्युरोच्या सहकार्याने देशातील सर्वच राज्यांकडून माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारावर ऊर्जा बचतीच्या क्षेत्रातील अग्रेसर राज्यांची निवड करण्यात आली असून, यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रासह अग्रेसर राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचाही समावेश आहे.  
 
ऊर्जा बचत योजनांची अंमलबजावणी, आर्थिक कार्यप्रणाली, संस्थात्मक क्षमता, ऊर्जा बचत व कार्यक्षमता या विषयांवर विविध राज्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला व निर्धारित गुणांकनाच्या आधारे निर्देशांक तयार करण्यात आला. या निर्देशांकात बांधकाम, उद्योग, कृषी, महानगरपालिका आणि वाहतूक क्षेत्रांमध्ये विविध ६३ निकष व ४ विश्लेषणात्मक निर्देशांकानुसार परीक्षण करण्यात आले. त्यानुसार देशातील सर्व राज्यांना चार श्रेणींमध्ये विभागण्यात आले. अग्रेसर राज्य, साध्यक राज्य, स्पर्धक आणि आकांक्षित अशा चार श्रेणींमध्ये ही विभागणी करण्यात आली असून महाराष्ट्र अग्रेसर राज्यांच्या श्रेणीत आहे.
बांधकाम क्षेत्रातील ऊर्जा बचतीबाबतच्या विविध निकषांवर करण्यात आलेल्या गुणांकनात महाराष्ट्राला ३० पैकी  १४ गुण मिळाले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ऊर्जा बचतीच्या निकषांवरील गुणांकणात  २५ पैकी १७.५,  महानगरपालिका क्षेत्रातील ऊर्जा बचतीमध्ये  १० पैकी ८ , वाहतूक क्षेत्रातील ऊर्जा बचतीमध्ये १५ पैकी १३ आणि कृषी क्षेत्रातील ऊर्जा बचतीत १५ पैकी ९ गुण महाराष्ट्राने मिळविले आहेत. तसेच, विश्लेषणात्मक निर्देशांकात महाराष्ट्राने ५ पैकी ४ गुण मिळविले आहेत.
नीती आयोगाने प्रथमत:च राज्यांचा  ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांक तयार केला असून देशातील विविध राज्यांमध्ये ऊर्जा बचत व ऊर्जेचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने आखण्यात येणाऱ्या नियोजनासाठी याचा फायदा होणार आहे. 

Best Reader's Review