Breaking News

संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 25-03-2020 | 12:51:39 am
  • 5 comments

संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार

 

लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
 
मुंबई दि. 24: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आज पोलिसांनी धाड टाकून मास्कच्या होत असलेला काळाबाजार उघडकीस आणला,  त्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारांवर याचप्रकारे कारवाई व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
केंद्र सरकारचे आभार
 
राज्य शासनाच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने देशांतर्गत विमान सेवा आज मध्यरात्रीपासून बंद केल्याबद्दल, जीएसटी रिर्टन दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याबद्दल तसेच विषाणूच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.
 
जगणे थांबवले नाहीजीवनशैली बदलली
 
आपल्याकडे राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचना आज पुन्हा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी, शेतमजूर यांना शेतात जाण्यास, काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आपण थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी केलेली नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर, कंपन्यांवर आपण बंदी घातलेली नाही. ज्या कंपन्या अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव, उत्पादन, कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे, त्यांना वाहतुकीत कुठेही अडवले जाणार नाही हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण जगणे थांबवले नाही तर जीवनशैली बदलली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मदतीचे अनेक हात पुढे
 
अनेक स्वंयसेवी संस्था, शिर्डीचे साई संस्थान, सिद्धीविनायक मंदिर न्यास, स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादात आवर्जून उल्लेख केला. त्यांना धन्यवाद दिले. हे रक्तदान करण्याचे दिवस आहेत. अशा काळात अनेक रक्तदान शिबीरे होतात, सध्याच्या परिस्थितीत  रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासारखा अनोखा कार्यक्रम केला. अशा प्रकारे योग्य ती सर्व काळजी घेऊन इतर संस्थाही रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
विषाणूला जिथे आहे तिथेच संपवायचे
 
पोलीस जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक रोखत आहेत, भाजी आणि दूध आणायलाही बाहेर जाऊ देत नाही अशा काही तक्रारी आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण  जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. आतापर्यंत जिथे विषाणूचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. विषाणूला आपल्याला आहे तिथेच पूर्ण शक्तीने संपवायचे आहे. आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही. खरेदीसाठी बाहेर पडणेही बंद केलेले नाही. परंतु प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. कुणीही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे आणि विनाकारण फिरत बसायचे असे करू नये, घरातच राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
 
100 नंबरवर फोन करा
 जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक, कंपन्या, कारखाने, बँका बंद नाहीत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घ्यावी, पोलीस त्यांना नक्की मदत करतील. जी माणसं धान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जातील त्यांनी पोलिसांना हीच खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्याची खात्री पटवून द्यावी, पोलिसांना यासाठी त्यांना परवानगी देण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्र्यांशी देखील चर्चा - मुख्यमंत्री

 

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही;
दुकानांमध्ये गर्दी करू नका
 
कोरोनाविषयक अधिकृत  माहितीसाठी राज्य शासनाचा व्हॉट्सअप ग्रुप
 
मुंबई दि 24: प्रधानमंत्र्यांनी  घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे . राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वस्त केले आहे.
 
 
प्रधानमंत्र्यांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली , माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर मी स्वत: प्रधानमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. प्रधानमंत्र्यांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात आपल्याला माहिती दिली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.
 
राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधी , दुध , भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा. 
 
व्हॉटसएप ग्रुप
 
कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसएप  चॅटबॉट  ग्रुप सुरु केला आहे याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही  मिळेल.
परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे, लपवायची नाही. कारण या साथीची लागण होण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

प्रधानमंत्र्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे

पालन होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 24 :- ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावे. परंतु याचा दूध, भाजीपाला, फळे, औषधै, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही पूर्ववत नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली असली, तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब, दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही  विचार सुरु आहे. राज्य सरकार जनतेची कुठलीही अडचण होऊ देणार नाही, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी  दिला आहे.
 
मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून ‘कोरोना’च्या संसर्गाला बळी पडू नये, हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय  सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी  वाहतूकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे, परंतु आता प्रत्येकाने आपापल्या घरात थांबूनच प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाचं पालन करावं, घरीच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
 
 

Best Reader's Review