Breaking News

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा; सुरक्षितता आणि आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 25-03-2020 | 12:35:24 am
  • 5 comments

सुरक्षितता आणि आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 24: उद्या हिंदु नव वर्षाचा प्रारंभ होत असून या दिवशी घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारली जावी. संयम, स्वयंशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी. यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करावा, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच उंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे. यातून प्रेरणा घेऊन आपणही ‘कोरोना’रुपी  संकटावर मात करू, गर्दी न करता घरगुती स्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच, यापुढेही शासनाच्या उपाययोजनांना  कृतिशील साथ द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करण्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

 
'कोरोना' संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा
 
मुंबई, दि. 24 :-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये. रस्त्यावर येऊ नये. गर्दी टाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असेही आवाहन त्यांनी  केले आहे.
 
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामूहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील, परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त

संकल्प करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

 
 
सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी
मुंबई, दि. 24 : कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करतानाच राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.
 
आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आतापर्यंत 107 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 15 रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत, ही समाधानाची बाब आहे. 
 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत, ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
      
सध्या मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाही आहे. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 
      
उद्या असलेल्या गुढी पाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात कोरोनाला दूर सारण्याच्या दृढ निश्चयाने करा. या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा. स्वयंशिस्त पाळून घरी थांबा, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.
 
राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले. 

Best Reader's Review