Breaking News

भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला खुलासा 

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 04-02-2020 | 12:12:50 am
  • 5 comments

भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी केला खुलासा 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेतली. यात अनेक प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. भाजपसोबत युती का तुटली यावर ही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'बाळासाहेबांना अनेकांनी धक्के देण्याचा प्रयत्न करुन पाहिले. ते त्यांना जमले नाही. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना धक्के दिले ते अजून सावरलेले नाहीत. बुद्धीबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ आहे. पण चाली जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत बुद्धीबळ खेळणं कठीण आहे.'

'मुख्यमंत्रीपद स्विकारणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. वचन देणं आणि वचन निभावणं, वचन का मोडलं गेलं. वचन मोडल्यानंतर दुसरा पर्याय नव्हता. भाजप सावरला आहे का मला माहित नाही. वचन पाळलं असतं तर काय गेलं असतं. मी कुठे आकाशातील चांद-तारे मागितले होते. मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते मागितलं होतं.'

'शिवसेनाप्रमुखांनी कधी सत्तेचं पद स्विकारलं नाही. माझी पण इच्छा नव्हती. पण ज्यांच्यासोबत होतो. त्यांच्यासोबत राहुन मी त्या दिशेने जावू शकत नाही. वेगळी दिशा स्विकारायची असेल तर त्यापुढे नाईलाज होता.'

'जे करायचं ते दिलखुलासपणे करायचं. अमित शाह आले. संबंध सुधारत असतील तर नवीन सुरवात करायला काय हरकत आहे. असा विचार केला होता. माझ्या मनात काहीही नव्हतं. लोकसभेतही युतीचा प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीतही हिंदुत्वासाठी युती टिकवली. माझ्य़ाकडून नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ही भूमिपुत्रासाठी जन्माली आली. नंतर हिंदुत्व स्विकारलं. भाजपसोबत एकत्र आलो. आजही हिंदुत्वाबाबत आमची भूमिका तीच आहे.'

कुठून निवडून जाणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'ताबडतोबेने आता विधानपरिषदेची निवडणूक येईल. विधानसभा म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून... तर बघुयात. आता जी जबाबदारी आली आहे ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेमध्ये कोणाला ही न दुखवता विधानपरिषदेवर जायला काय हरकत आहे. ते मागल्या दारातनं, या दारातून... मी तर म्हणेल मी छपरावरुन आलो आहे.'

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर संताप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोदी सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मी महाराष्ट्रातील २ मंत्र्यांची यासाठी नेमणूक केली आहे. याचा पाठपुरावा केला जाईल. हा जो विषय आहे तो कोर्टात आहे. पण तो न्यायालयात असल्यावरही कर्नाटक सरकार बेळगाव, निपाणीसह भाषिक अत्याचार करत आहे. या विरोधात वांरवार आवाज उठवला जात आहे. 

केंद्र सरकारवर टीका

'केंद्र सरकार हे राज्य सरकारचं पालक असतं. प्रकरण कोर्टात असताना केंद्र सरकारने पालकत्वाची भूमिका दोन्ही राज्यांची घेतली पाहिजे. तुम्ही निपक्षपाती राहा. ठीक आहे, आमचं चुकलं त्यांचं चुकलं, जे कोणाचं चूकत असेल ती भूमिका तुम्ही कोर्टात सांगा. पण गेल्या ५ वर्षात केंद्र सरकार कर्नाटकच्या बाजुने बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ते संतापजनक आहे.'

भाजपला उद्धव ठाकरेंचं उत्तर

पक्ष फोडून तुम्हाला माणसं चालतात, मग त्या पक्षासोबत हात मिळवला तर काय फरक पडतो. त्याच पक्षातील मोठे मोठे नेत घेत भाजपने वेगेवगळ्या राज्यात त्यांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद दिले आहे. ते पण त्या विचारधारेतीलच होते ना?. तुम्ही काय गंगाजल घेऊन फिरतात की सगळीकडे? वाल्याचा वाल्मिकी करण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही. खरंतर हा वाल्मिकी ऋषींचा आणि वाल्याचा देखील अपमान आहे. वाल्या प्रामाणिकपणे जदत होता. तपश्चर्या करुन तो वाल्मिकी झाला. सत्तांतर करुन नाही केलं. 

'मी काय धर्मांतर केलं आहे का, आपण म्हणतो तेच खरं असं आहे का? केंद्रात जी सत्ता आहे, त्यात भिन्न विचारधाराचे लोकं आहेत. नितीश कुमार, पासवान, चंद्राबाबू, मेहबुबा मुफ्ती यांची विचारधारा कुठे एक होती.'

'विचारधारा वेगवेगळ्या आहेत. वेगळी विचाराधारा पेक्षा राज्याचं आणि देशाचं हिताची विचारधारा एक आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांसाठी देखील त्यांच्यासाठी जावून ते प्रचार करतात. नैतिकता आम्हाला शिकवू नका.' 

Best Reader's Review