Breaking News

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणी प्रदर्शन कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 26-01-2020 | 09:18:30 pm
  • 5 comments

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणी

प्रदर्शन कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

 

मुंबई, दि. 26 : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील प्राणी-पक्षांच्या नवीन सहा प्रदर्शन कक्षांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
 
मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आकर्षणाचे ठिकाण आहे. देशातील सर्वात जुन्‍या प्राणी संग्रहालयांपैकी एक असलेल्‍या या संग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा महत्‍त्‍वाकांक्षी प्रकल्‍प मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने राबविण्‍यात येत आहे. यामध्ये भारतातील सर्वप्रथम व आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे असे हम्बोल्‍ट पेंग्विन कक्ष खास आकर्षण ठरत असून संग्रहालयाचे आधुनिकीकरण आणि त्यात नव्या प्राण्यांची भर पडत आहे. संग्रहालयात 17 प्रदर्शन कक्षांचाही समावेश आहे. या पैकी कोल्‍हा, बारशिंगा व काळवीट प्रदर्शनी कक्ष यापूर्वी पूर्ण करण्‍यात आले असून आज देशी अस्‍वल, मद्रास पाँड कासव, तरस, बिबट्या, पक्षी पिंजरा (2) व कोल्‍हा यांच्या प्रदर्शन कक्षांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सर्वश्री अरविंद सावंत, राहुल शेवाळे, अनिल देसाई, आमदार सर्वश्री मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर, श्रीमती यामिनी जाधव, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहरे) ए. एल. जऱ्हाड यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No photo description available.

Image may contain: plant and outdoor

केवळ प्राणीसंग्रहालय नाही
तर त्यांचे संरक्षणही - आदित्य ठाकरे
 
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात केवळ प्राण्यांना पिंजऱ्यांत बंदिस्त करून ठेवण्याची संकल्पना बदलून त्यांना नैसर्गिक आधिवास निर्माण करून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना प्रजोत्पादन आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींनाही वाव देण्यात आल्यामुळे अनोखे प्राणीसंग्रहालय आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या आधुनिकीकरणासाठी तत्कालीन सहआयुक्त सुधीर नाईक आणि प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांचे विशेष कौतुक केले पाहिजे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Best Reader's Review