Breaking News

जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 10-01-2020 | 12:07:47 am
  • 5 comments

जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी

आणि अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा
 
औरंगाबाद, दि. ९ : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
या बैठकीकरिता यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रदीप जैस्वाल, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) किशोरराजे निंबाळकर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ.संजय चहल, सचिव सार्वजनिक बांधकाम (रस्ते) सी.पी. जोशी, कृषी आयुक्त सुहास दिवसे, इतर विभागांचे प्रधान सचिव, सचिव तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.साधना तायडे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त पराग सोमण, वर्षा ठाकूर-घुगे, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. यावेळी थेट मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव विकास खारगे, श्री.संजयकुमार व इतर काही विभागांचे सचिव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपस्थित सचिवांसमोर मांडल्या.
 
यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील HVDS अंतर्गत अपेक्षित कामे, मुख्यमंत्री सोलार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन, मराठवाडा पॅकेजअंतर्गत मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची निधीअभावी अपूर्ण कामे, कौडगाव, वडगाव येथील औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमीनीचे झालेले प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, वॉटर ग्रीड प्रकल्प, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाय योजना, उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, श्री तुळजाभवानी मंदिर येथील घाटशिळ रोड येथे देवीची विशाल मूर्ती उभारणे, ध्यान मंडप, भोजन कक्ष, दर्शन मंडप, अभिषेक मंडप, स्कायवॉक या विकास कामांसाठी येणारा खर्च, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची सद्यस्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्यस्थिती, कृषीपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषध पुरवठा, पीकविमा योजनेचे उर्वरित अनुदान, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळ उभारणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरील झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेतील वृक्षांचे मनरेगातून संवर्धन, राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणारे असहकार्य, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारांच्या निर्मितीचा प्रलंबित प्रश्न, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतील लोकवाटा सहभागाची अट रद्द करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली, समस्या मांडण्यात आल्या.
 
याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना करताना म्हणाले, वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवावे, सोलार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवावी, ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करावा, महावितरण आपल्या दारी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात यावी, ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करण्यात यावी, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे आवश्यक  निधीची मागणी करावी. जनतेच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून अथक प्रयत्न करणे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ही विकासकामे करण्यासाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट सिटी संकल्पचित्र फलकाचे अनावरण
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बैठकीसाठी आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत  स्मार्ट सिटी बस व बसथांबा उपक्रमाच्या संकल्पचित्र फलकाचे अनावरण केले. यावेळी त्यांनी स्मार्ट इकॉलॉजी, स्मार्ट कनेक्ट, स्मार्ट लाईव्ह संकल्पनेच्या जाहिरात फलक आणि स्मार्ट सिटी बस तसेच  औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या जागरूक नागरिक व बडी कॉप मोबाईल व्हॅनची पाहणी केली. यावेळी त्यांनी बडी कॉप मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

Best Reader's Review