Breaking News

अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-12-2019 | 12:47:48 am
  • 5 comments

अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी

बोललोय; फडणवीसांचा खुलासा

तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस​

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्याबाबत मोठा खुलासा केला.राज्यात उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. ठाकरे सरकार आंतरविरोधाने भरलेले असल्यामुळे फार काळ टिकणार नाही. राष्ट्रवादीचे कोणाशीही जमते. ते कुठेही जाऊ शकतात. अद्याप मंत्रीपदाचे आणि खातेवाटप झालेले नाही. त्यावरुन लक्षात येत आहे. तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार, हा प्रश्नच आहे. देशात कुठेही असे सरकार आलेले नाही. त्यामुळे ते किती दिवस चालले हे कोणीही सांगू शकत नाही, असा टोला महाराष्ट्र विकासआघाडी सरकारला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी लगावला. 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये हे सरकार कोसळले होते. या निर्णयाबाबत त्यांना विचारणा केली असता फडणवीस यांनी म्हटले की, त्यावेळी अजित पवार यांनी आपण शरद पवार यांच्याशी भाजपसोबत जाण्यासंदर्भात चर्चा केल्याचे आम्हाला सांगितले होते. शिवसेना आणि काँग्रेससोबत आम्ही सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करू. मी या गोष्टीची कल्पना शरद पवार यांना दिली आहे, असा दावा त्यावेळी अजित पवारांनी केल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सरकार स्थापनेचा निर्णय योग्य किंवा अयोग्य होता, हे मी वेळ आल्यावर सांगेन, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. मात्र, ऐनवेळी आमदारांनी साथ सोडल्याने अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. परंतु, सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांशी माझे बोलणे करून दिले होते, असा दावा फडणवीस यांनी मुलाखतीदरम्यान केला. मात्र, सरकार स्थापनेच्या रात्री नेमके काय घडले, हे मी योग्य वेळ आल्यावरच सांगेन. या सगळ्या प्रक्रियेत भाजपने कोणाशीही डील केली नाही. आम्हाला डील करायचीच असती तर आम्ही अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युलासाठी राजी झालो असतो, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

तसेच महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्रसारमाध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही ७० टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, ४४ टक्के मते मिळवणाऱ्यांनी एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'मी पुन्हा येईन' हा माझा गर्व नव्हता- देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील 'मी पुन्हा येईन' ही घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला का, या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, 'मी पुन्हा येईन' ही कवितेची साधीशी ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली त्यामुळे सर्वत्र पसरली. 'मी पुन्हा येईन'ला कुठेही गर्वाचा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' अशी माझी भावना होती. गेल्या पाच वर्षांमध्ये मी एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली. याबाबत मी समाधानीही आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात 'पैलवान कोण' यावरून जुगलबंदी रंगली होती. यासंदर्भातही देवेंद्र यांनी मुलाखतीदरम्यान भाष्य केले. मी शरद पवार यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीसला आपली क्षमता माहिती आहे. मी कधीही स्वत:च्या नव्हे तर पंतप्रधान मोदीजी यांच्या नावावर मते मागितली. मी कायमच स्वत:च्या मर्यादा आणि क्षमता समजून काम केले, असे फडणवीस यांनी म्हटले.

सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस

राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे. मात्र, त्यानंतर जनतेच्या विरोधातील निर्णय घेतले तर मी या सरकारला सोडणार नाही. त्यांना धारेवर धरणार आहे. माझी आक्रमकता ही पहिल्या दिवशी पाहिली आहे. त्यामुळे मी या सरकारला जाब विचारणार आहे. पण काही काळ देणार आहे, त्यानंतर त्यांना तो वेळ मिळणार नाही. आक्रमकता हा माझा पिंड आहे. त्यामुळे धारेवर धरले जाईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.सध्या राज्यात नवीन सरकार आहे. तसेच माझे मित्र आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे मी या नव्या सरकारला काही वेळ देणार आहे. त्यांनी चांगले निर्णय घेतले तर त्याचे स्वागत असेल. मात्र, जर त्यांनी चुकीचे निर्णय घेतले तर मी त्यांच्यावर टीका जरुर करणार. या सरकारला धारेवरही धरणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आधीच्या सरकारच्या निर्णयाचा फेरआढावा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तो सरकारचा अधिकार आहे. तो त्यांनी घ्यावा. मात्र, जे विकासासाठी निर्णय घेतले आहेत. ते जर रद्द केले तर अनेक बाबींवर याचा थेट परिणाम होणार आहे. ते तसे काही करणार नाही, याची मला खात्री आहे. मात्र, सध्या जे चित्र उभे केले जात आहे, ते चुकीचे आहे. आज राज्याला अर्धा टक्क्यांनी कर्ज मिळाले आहे. एवढ्या कमी किमतीत कर्ज मिळणार आहे का? त्यामुळे एखादा प्रकल्प रद्द करणे म्हणजे मागे घेवून जाणे होय. आर्थिक दृष्टी मेट्रो प्रकल्प नवी दिशा देणारा आहे. यावर अनेक छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे ते प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

हे तीन पक्षांचे सरकार आहे. ते किती दिवस चालेल ते माहीत नाही. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही. तसेच उद्धवजी यांनी कोठेही तोडण्याची भाषा केलेली नाही. किंवा मीही काही भाष्य केलेले नाही. आमच्या दोघांच्यामध्ये कोणतीही भींत नाही. त्यामुळे ही मैत्री पुढे कायम राहिल, असे  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

Best Reader's Review