Breaking News

पक्षात अन्याय होत राहिला तर वेगळा विचार करावा लागेल- खडसे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-12-2019 | 12:29:17 am
  • 5 comments

पक्षात अन्याय होत राहिला तर

वेगळा विचार करावा लागेल- खडसे

मुंबई: उत्तर महाराष्ट्रात भाजपविरूद्ध भाजप असे चित्र दिसत आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी जळगावात भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर आले. मात्र, एकनाथ खडसे या बैठकीला पोहोचणार नाही अशी चर्चा होती. अखेर, ऐनवेळी खडसे यांनी बैठकीला हजरी लावली.

पक्षात माझ्यावर वारंवार अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दिला. ते शनिवारी भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. उत्तर महाराष्ट्राची बैठक असताना मला केवळ जळगाव जिल्ह्याच्या बैठकीपुरतेच बोलवण्यात आले. अशाप्रकारे मला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. कोअर कमिटीतूनही काढून टाकण्यात आले आहे. पक्षातील काही नेते मला टार्गेट करत आहेत. माझ्यावर अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल. मी काही देव नाही. पण निर्णय घेताना पक्षाला सांगूनच निर्णय घेईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपमधीलच काहीजणांनी रसद पुरवली, असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांकडून खडसेंची समजूत काढली जाईल, अशी शक्यता होती. 

मात्र, बैठकीतून बाहेर पडताना खडसे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना बोलून दाखवल्या. मला पक्षापासून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता मी काय केलं पाहिजे, हे मी कार्यकर्त्यांनाच विचारणार आहे. मी पक्ष सोडणार नाही. हे मी अनेकवेळा सांगितलं आहे. पक्ष विस्तारासाठी मी चाळीस वर्ष योगदान दिलं आहे. त्यामुळे मी पक्ष कसा सोडेल? मात्र, सतत अन्याय झाल्यास मी काही देव नाही, मी माणूस आहे, मलाही भावना आहेत. त्यामुळे माझ्यावर अन्याय होतच राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे खडसे यांनी सांगितले. 

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पक्षातीलच काही नेत्यांमुळे परळीत पंकजा मुंडे यांचा आणि मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. मात्र, खडसेंच्या आरोपात काही तथ्य नाही, रोहिणींच्या पराभवाबाबत खडसेंकडे कोणतेही पुरावे असल्यास त्यांनी ते नावानिशी सादर करावे, असे आव्हान गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर खडसे यांनी महाजनांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी परवानगी दिल्यास जनतेसमोर नावानिशी पुरावे सादर करीन, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकप्रसंगी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना वाटत असेल, त्यांच्याकडे पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी माहिती असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. स्वत: एकनाथ खडसे या मतदारसंघात यापूर्वी किती मतांनी निवडून आले हे अभ्यासले पाहिजे. या निवडणुकीत एक वेळ ते स्वत: उमेदवार असते तर निवडून आले असते, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

Best Reader's Review