Breaking News

पर्यावरण कार्यकर्त्यांवरील  गुन्हे मागे घेण्याचे आदेश

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 02-12-2019 | 12:14:49 am
  • 5 comments

पर्यावरण कार्यकर्त्यांवरील 

गुन्हे मागे घेण्याचे आदेश

मुंबई: आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 

आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या होत्या. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत ४ ऑक्टोबरला रात्रीपासून झाडे तोडायला सुरुवात झाली होती. हे वृत्त समजल्यानंतर अनेक आंदोलक आरेमध्ये येऊन धडकले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यापैकी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. आरे कार शेड मधील झाडं तोडताना पर्यावरण कार्यकर्त्यांनी वृक्ष तोडीला विरोध करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यावरण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हेच गुन्हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे. त्यामुळे अंतिम तोडगा निघाल्याशिवाय आरेतील एक पानही तोडणार नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले होते. तसेच ही स्थगिती केवळ कारशेडच्या कामाला आहे, उर्वरित प्रकल्पाला नव्हे, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले होते. 

  ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिलीय. त्याचा आढावा घेतल्याशीवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंधाधूंद कारभार चालणार नाही असंही त्यांनी सांगितलं. रातोरात झाडांची कत्तल झाली हे चालणार नाही. ते पुढे म्हणाले, मी अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रिपदावर आलोय. मी जबाबदारीपासून पळालो असतो तर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून घ्यायला लायक ठरलो नसतो. ही जबाबदारी मोठी आहे कारण तीन पक्षांचं सरकार आहे. अजुनही मला मुख्यमंत्री झालो असं वाटतच नाही. 

Best Reader's Review