Breaking News

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 01-12-2019 | 06:05:17 pm
  • 5 comments
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी
देवेंद्र फडणवीस यांची निवड 
मुंबईदि. 1 : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोध हा शब्दच मला मान्य नाही. त्यामुळे यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया.
विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदी श्री. फडणवीस यांची निवड करण्यात येत असल्याचे घोषीत केले. सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह उपस्थित मंत्री आणि सदस्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.
निवडीनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदी निवडीबद्दल मी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करतो. श्री. फडणवीस हे मागील अनेक वर्षांपासून माझे मित्र आहेत. आता मी सत्तेत आणि ते विरोधात असले तरी मैत्रीत फरक पडणार नाही.
विधानसभेत निवडून आलेल्या सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांचे ‘जनहित’ हेच एकमेव उद्दिष्ट असते. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटातील सदस्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, सर्वांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे विरोध आहे कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया, असेही श्री. ठाकरे पुढे म्हणाले.
 मला राज्यातील शेतकऱ्याला फक्त कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचे आहे. याकामी विरोधी पक्षाचीही मदत लागेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे केवळ विरुद्धार्थी शब्द न राहता सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी कार्य करु. याकामी विरोधी पक्षनेत्यांची निश्चितच साथ लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
 
सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
 
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, श्री. फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2003 मध्ये विधीमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाला विरोधी पक्षनेता म्हणून विराजमान होण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. जनतेसाठी काम करण्याची तळमळ ही विरोधी पक्षनेत्याकडे असते. ही परंपरा श्री. फडणवीस पुढील काळात चालवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन- देवेंद्र फडणवीस
 
अभिनंदनच्या प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो. श्री. ठाकरे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी ज्या योजना आखतील, जे काही निर्णय घेतील, त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमीच सहकार्य करू. सभागृहात नेहमीच नियम व संविधानानुसार कामकाज केले जाईल. जनतेच्या हक्कासाठी सर्व संसदीय आयुधाचा वापर केला जाईल. विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची फार मोठी परंपरा आहे. या पदावरील प्रत्येक नेत्याने आपापल्या परीने समाजासाठी प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. या पदाची उंची आणखी वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील,  किशोर जोरगेवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, धनंजय मुंडे, बच्चू कडू, हितेंद्र ठाकूर आदींची भाषणे झाली. सर्वांनी निवडीबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.
 

…मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा

 विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला ७० टक्के मार्क्स मिळाले तरी आम्ही मेरिटमध्ये आलो नाही. मात्र ज्यांना ४० टक्के मार्क्स मिळाले. ते मेरीटमध्ये नसताना देखील त्यांनी सत्ता मिळवली. ही लोकशाही आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षात बसण्याचा आम्हाला अनुभव आहे. जनतेच्या कल्याणासाठी विरोधी पक्ष कायम काम करेल, असे त्यांनी सांगितले. 
पुढे फडणवीस यांनी सांगितेल की,  कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास मनाई नाही. आम्ही याठिकाणी छत्रपतींचे नाव घेऊन आलो आहे. आम्ही कधीही राजे झालो नाही, कालही सेवक होतो आणि आजही सेवक आहे. तसंच, तुम्ही मला किती नावं ठेवली. माझ्याबद्दल काहीही बोलले तरी देखील मी माझे कर्तव्य करेल. मला जी जाबादारी मिळाली आहे ती यासाठीच मिळाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 
मी पुन्हा येईल असे म्हटले होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला निवडणून दिले. त्यांची अपेक्षा तिच होती पण जनादेशाचा सन्मान झाला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. मी पुन्हा येईल असे म्हणालो होतो पण मी टाईम टेबल सांगितला नव्हता. लोकशाही आहे लोकशाही मध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे आता वाट पहा, असे देखील ते म्हणाले.  
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करु. मुख्यमंत्री तुम्ही केव्हाही आवाज द्या तुमच्या आवाजाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. सहकार्य केव्हाही मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र सरकार जनतेचे सहकार्य करत नसेल तर त्यावेळी आम्ही सरकारवर आसोडे ओडण्याचे काम करु, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. 
अभिनंदनाच्या भाषणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले,”अभिनंदनाच्या ठरावावर अनेकांनी चांगली भाषणं केली. पण त्यात काहींची भाषण शोले सिनेमातील लडका तो अच्छा है अशा पद्धतीची होती. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नव्हे. काल जे विरोधात होते, ते आज सरकामध्ये बसले आहेत. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे मी म्हणतो की, मी पुन्हा येईल. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा,” असा शेर सुनावत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं.
मेरा पानी उतरता देख
मेरे किनारे पर घर मत बसा लेना
मैं समंदर हूँ
लौटकर वापस आऊँगा !
 

Best Reader's Review