Breaking News

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 01-12-2019 | 05:43:22 pm
  • 5 comments

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड

मुंबई : 14 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना फाल्गुनराव पटोले यांची निवड करण्यात आली आहे.

किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, डॉ.तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे यांनी श्री. पटोले यांच्या नावाला अनुमोदन दिले.

विधानसभेचा गौरव राखण्याचा प्रयत्न करेन- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नवनिर्वाचित अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुंबई, दि. 1 : संसदीय लोकशाहीत विधानसभेची गौरवास्पद परंपरा आहे. या परंपरेचा गौरव राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत सांगितले.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सभागृहाने केलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना श्री. पटोले बोलत होते. 14 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री.पटोले म्हणाले, येथे Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb या चार D वर आधारित कामकाज करत असताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील, शेतकरी तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न राहील.
कोणावरही अन्याय होऊ देऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याची विधानसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च स्थानी आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. श्री. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्री.पटोले यांचा स्वभाव हा बंडखोर आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपलं मत मांडत असताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा नेता आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांभाळून घेत योग्यवेळी समज देवून कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
विरोधी पक्षाकडूनही सहकार्याची अपेक्षा- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. श्री.पटोले यांनी दोन्ही बाजूला काम केलेले असल्याने दोन्ही बाजूच्या आशा आणि अपेक्षा त्यांना माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होईल. आतापर्यंत या पदावर काम केलेल्या सर्व अध्यक्षांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या पदाची गरिमा ते राखतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनीषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल आणि ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अभिनंदनपर भाषण केले.
 
 

Best Reader's Review