Breaking News

आरे कारशेडच्या कामांना स्थगिती; आढाव्यानंतर पुढील निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 30-11-2019 | 12:07:41 am
  • 5 comments

आरे कारशेडच्या कामांना स्थगिती 

आढाव्यानंतर पुढील निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई, दि. 29 : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.भाजप सरकारच्या काळातील या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोख लावली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला विरोध नसल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे तर कार्यवाह विवेक भावसार यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिलीय. त्याचा आढावा घेतल्याशीवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंधाधूंद कारभार चालणार नाही असंही त्यांनी सांगितलं. रातोरात झाडांची कत्तल झाली हे चालणार नाही. ते पुढे म्हणाले, मी अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रिपदावर आलोय. मी जबाबदारीपासून पळालो असतो तर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून घ्यायला लायक ठरलो नसतो. ही जबाबदारी मोठी आहे कारण तीन पक्षांचं सरकार आहे. अजुनही मला मुख्यमंत्री झालो असं वाटतच नाही.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांपासून पत्रकार संघाशी जे ऋणानुबंध आहेत, माझ्यापासून ते ‌अजून दृढ होत आहेत, याचा आनंद आहे. मी असा मुख्यमंत्री आहे, ज्याची कोणाला आशा ही नव्हती. माझा कुटुंबातून कोणीच सरकारमध्ये काम केलं नाही. मी आतापर्यंत फक्त 2 ते 3 वेळा मंत्रालयात आलो आहे. इतक्या वर्षांमध्ये ही महाराष्ट्राची स्थिती तशीच आहे. जेव्हा कोणता पत्रकार कोणत्या व्यक्तीवर टीका करतो तर त्याने त्याचा विचार केला पाहिजे असं माझे आजोबा सांगायचे.'शासन चालविण्याचे आव्हान मोठे असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करायचा आहे. पत्रकारांची टीका सकारात्मक हवी. त्यासाठी पत्रकारांनी या शासनाचे कान, नाक, डोळे होऊन सरकारच्या घोषणांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनासोबत यावे. तसेच हे काम करणारे सरकार असून या शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांनी विधायक सूचना करुन सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
प्रश्नपत्रिका तयार करणं सोपं आहे. मात्र उत्तर पत्रिका तयार करणं अवघड आहे. हे आपल्या सगळ्यांचे सरकार आहे. जनतेच्या पैशातून विविध योजनांवर खर्च केला जातो. त्यामुळे योजनांवर खर्च करताना हा करदात्याचा पैसा आहे, हे लक्षात ठेवून उधळपट्टी होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आज झालेल्या सचिवांबरोबरच्या बैठकीत केल्या आहेत. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. पुढील निर्णय होईपर्यंत तेथे वृक्षतोडीस स्थगिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.   
मी मुंबईत जन्मलेला पहिलाच मुख्यमंत्री असल्यामुळे मुंबईसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू आहे. मात्र, त्याबरोबरच राज्यातील इतर शहरांसाठीही कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलही विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्याची घोषणा केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तुम्ही वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, सरकारी जबाबदारी स्वीकारल्यावर जे काही करावं लागतं ते करावं लागेल. मात्र मातोश्रीशी असलेलं माझं नातं हे काय आहे हे काही वेगळं सांगायला नको असं सांगत त्यांनी स्पष्टपणे त्याचं उत्तर देणं टाळलं. तरी वर्षावरून कारभार करण्याचे संकेत त्यांनी दिलेत.

रश्मी वहिनींचा किती वेळा फोन आला?

आज किती वेळा रश्मी वहिनींचा फोन आला होता असा प्रश्न विचारल्यावर पत्रकार परिषदेत हशा पिकला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आज तिचा एकदाही फोन आला नाही. त्यांच्या भगव्या कुर्त्यावरूनही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुठल्याही लॉण्ड्रीत गेलो तरी हा रंग बदलणार नाही. कामाच्या व्यस्ततेत जेवण वेळेवर व्हाव यासाठी रश्मी ठाकरे या कायम दक्ष असतात. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता.
 
वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या परंपरेची माहिती देऊन, राज्याच्या विकासात पत्रकारांनी सहकार्य करावे, या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व पत्रकार सहकार्य करतील, असे सांगितले.मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष दीपक भातुसे, कोषाध्यक्ष महेश पावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.

Best Reader's Review