Breaking News

ठाकरेंच्या निर्णयावर फडणवीसांची टीका 

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 11:52:45 pm
  • 5 comments

ठाकरेंच्या निर्णयावर फडणवीसांची टीका 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात भाजपने अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने आरे कारशेडसंदर्भात घेतलेल्या ठाम निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे, असे ट्विट करत मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून देत फडणवीसांनी 'सेव्ह मेट्रो सेव्ह मुंबई' असा नारा हॅशटॅगच्या माध्यमातून दिला आहे.   जपानच्या जायकाने अल्प  व्याजदराने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. राज्य सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयामुळे भविष्यात पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी परदेशी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत. १५ वर्षांपासून रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होईल, अशी चिंता देखील फडणवीसांनी व्यक्त केली आहे. 

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. आरेतील मेट्रो कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली तर आतापर्यंत झालेल्या ७० टक्के कामाला अर्थच उरणार नाही. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईच्यादृष्टीने झालेले हे अत्यंत मोठे काम आहे.   

आम्ही आरेतील झाडे ही काही भाजप पक्षाच्या कल्याणासाठी तोडली नव्हती, असे सांगत आमदार राम कदम यांनी आपला विरोध व्यक्त केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच मेट्रोच्या कारशेडीसाठी ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला आता पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी हा निर्णय बदलात येणार नाही. मेट्रो कारशेडचे काम थांबवणे म्हणजे मुंबईचा विकास रोखण्यासारखे आहे, अशी टीका राम कदम यांनी केली. 

Best Reader's Review