Breaking News

'ठाकरे सरकार'मध्ये उपमुख्यमंत्रिपद ठरणार कळीचा मुद्दा?

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 11:33:40 pm
  • 5 comments

'ठाकरे सरकार'मध्ये उपमुख्यमंत्रिपद ठरणार कळीचा मुद्दा?

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपदावरून अजूनही गोंधळात गोंधळ सुरूच आहे.विधानसभेत महाविकास आघाडीचं बहुमत सिद्ध होण्यापूर्वीचं सत्तापदांवरून दोन्ही काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याचं बोललं जातं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर  येताचं  सत्तापदांच्या वाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्रिपदावरून दोन्ही काँग्रेसमध्ये ही चढाओढ सुरू झाल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा होती. विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचं पुढं आलं होतं. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं, याच्यावरून अंतर्गत वाद सुरूच आहेत. त्यातच काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं या वादात भरच पडलीय.  

विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद आणि एक कॅबिनेट मंत्रिपद  काँग्रेसला हवं आहे. खरंतर राजकारणातील  शह काटशहाच्या खेळीनंतर राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात आलं आहे.  सत्ता वाटप हा या तीन पक्षांच्या आघाडीतील कळीचा मुद्दा होता म्हणून जवळपास महिनाभर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं.

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं आलंय. विधानसभा अध्यक्षाच्या नावावर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Best Reader's Review