Breaking News

शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 01:15:37 am
  • 5 comments

शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने

निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28 : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ.नितीन राऊत उपस्थित होते.महाराष्ट्रातील तमाम जनतेला अत्यंत नम्रपणे नमस्कार करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर जनतेचे आभार मानले. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असेल, कोणालाही दहशत वाटेल असे वातावरण निर्माण होणार  नाही, याची काळजी घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपले वाटेल या दिशेने प्रयत्न असतील.
याशिवाय पहिल्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भाती मुद्दा केंद्रस्थानी होता, असे ते म्हणाले. हातामध्ये काही नव्हते तेव्हा शेतकऱ्यांना फक्त दिलासा दिला. शेतकऱ्यांसाठी तुटपूंजी मदत करायची नाही. त्यांच्यासाटी  भवदिव्य करण्याचा विचार नाही तर निश्चय आहे. दोन दिवसांत आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.  
मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणाबाजीचा पाऊस पाडला. मात्र त्यांना काहीच मिळालेलं नाही. मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आलं. मात्र प्रत्येक्षात त्याच्या खात्यामध्ये पैसे गेले नाहीत. पीक विमा योजनाही फोल ठरली. याचा आढावा घेऊन शेतकऱ्याला मदत करणार आहोत. आमच्या मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्याची निराशा होणार नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे भडकले

पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना शिवसेना सेक्युलर झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. सेक्युलर म्हणजे काय? तुम्हीच सांगा असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेतलेल्या छगन भुजबळांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. राज्यघटनेत जे लिहिले आहे तेच सेक्युलर आहे. हे सरकार सामान्य जनतेसाठी काम करणार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Best Reader's Review