Breaking News

अखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार... उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 12:32:22 am
  • 5 comments

अखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार...

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीच्या सरकारचा शपथविधी गुरुवारी शिवतीर्थावर पार पडलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली.  छत्रपती शिवाजी महाराज आणि कुटुंबियांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की...'  अशा शब्दांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.उद्धव यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसहीत सात मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.  हा सोहळा स्मरणीय करण्यासाठी शिवसेनेकडून तयारीत कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शपथविधीसाठी खास असे व्यासपीठ उभारले आहे. एकूणच शिवाजी पार्कमधील आजचा सोहळा हा लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.हिंदू ह्रद्यसम्राट आणि दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला त्याच शिवतिर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.
 
शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत एकनाथ संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशिनाथ राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
 
 
 
आजच्या शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. कमलनाथ, माजी मुख्यमंत्री सर्वश्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, देशभरातून विशेष निमंत्रित करण्यात आलेले सर्व क्षेत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते.
 
शपथविधीची क्षणचित्रे
 
  • आजच्या शपथविधी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलले होते.
  • महाराष्ट्र गीत आणि शिव पोवाड्याने शिवाजी पार्क मैदानातील वातावरण चैतन्यदायी झाले होते.
  • शपथविधी सोहळ्यासाठी शेतकरी आणि वारकरी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.  त्यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत होती.
  • सांगली येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या वारकरी दाम्पत्याने मंचावर येऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
  • शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच निघून गेले.

Best Reader's Review