Breaking News

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 16-11-2019 | 11:57:18 pm
  • 5 comments

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त

शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

मुंबई, दि. १६ : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज जाहीर केला.     
या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने अखेरच्या दिवसात अवकाळी पावसाच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ही मदत जाहीर केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात राज्य विधानसभेची मुदत संपली आणि नवीन सरकार अजून बनू शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाली. या प्रशासकीय स्थित्यंतरामुळे शेतकऱ्यांची मदत लालफितीत अडकली होती. शुक्रवारी भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने ही जाहीर केलेली मदत वितरीत करण्याची विनंती केली होती. अभाविपने राज्यपालांना अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची विनंती केली होती.

काँग्रेस महाआघाडी शनिवारी राज्यपालांची शेतकरी मदतीसंदर्भात भेट घेणार होती. मात्र, तत्पूर्वीच राज्यपालांनी मदत वितरण सुरू करण्याचे आदेश काढल्याने महाआघाडीने राज्यपालांची भेट घेणे टाळले. ठरलेल्या वेळेआधी केवळ पाऊण तास आधी ही भेट आघाडीकडून रद्द करण्यात आली. मात्र, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नेते मुंबईबाहेर असल्याने पुढील आठवड्यात पुन्हा राज्यपालांची वेळ गफहेण्यात येईल, असे पत्रकारांना कळवले. या तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगाकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात आहेत, असे कारण एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

Best Reader's Review