Breaking News

पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी रणजीत सिंग यांना अटक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 16-11-2019 | 11:23:45 pm
  • 5 comments

पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी

रणजीत सिंग यांना अटक

मुंबई :- पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रणजीत सिंग यांना अटक केली आहे. रणजीत सिंग पीएमसी बॅंकेचे माजी संचालक असून भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचे पुत्र आहेत. या प्रकरणी आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडीटर्सना अटक केली होती.
पीएमसी बॅंकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळ्यात बॅंकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बॅंकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. यात एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बॅंकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका सर्वसामान्य खातेदारांना बसला आहे. आरबीआयने बॅंकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बॅंकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.
दरम्यान, रणजीत सिंग यांचे वडील सरदार तारा सिंग भाजपचे माजी आमदार आहेत. 1999 पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेवर गेले होते. यंदा सरदार तारा सिंग आपला मुलगा रणजीत सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण भाजपने मुलूंडमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. आता मिहिर कोटेचा मुलुंडमधून आमदार आहेत.

Best Reader's Review