Breaking News

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 08:29:49 pm
  • 5 comments

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’

सरकार; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र 

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय 

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्त बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाल्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे असा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. या बहिष्कारामागची भूमिका विशद करताना धनंजय मुंडे म्हणाले, “१७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. दुष्काळाने राज्य होरपळत आहे. सरकारचे दुष्काळाकडे लक्ष नाही. आम्ही दुष्काळी भाग पिंजून काढला. मात्र राज्याचे मंत्रीसुद्धा दुष्काळी भागात फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना विदेशवारीनंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे. असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती ती मान्य केली नाही परंतु ती मागणी या अधिवेशनातही लावून धरणार आहोत. तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी ही मागणीही लावून धरणार आहोत, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हा फक्त आभास निर्माण करण्यात आला होता. गृहनिर्माण हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. बिल्डर धार्जिणे हे सरकार आहे. यावर आम्ही आवाज उठवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. आज ६ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काढायला हवे होते असेही ते म्हणाले. 1200 कोटीचा एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांना केवळ मंत्री मंडळातून काढून काही होणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे.

महाराष्ट्रात शाश्वत विकास दिसला नाही परंतु आभासी विकास मात्र दाखवला गेला असा आरोपही मुंडे यांनी केला. ४५ वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही तेवढी बेरोजगारी यावेळी वाढली आहे. राज्यातील बेरोजगारी संपली असा फक्त आभास निर्माण केला गेला आहे. त्यामुळे आम्ही बेरोजगारांना दरमहा रोजगार भत्ता द्यावा ही मागणी सभागृहात लावून धरणार आहोत.

आरक्षणाचाही आभास निर्माण केला गेला आहे. राज्यातील एसएससी बोर्डात देण्यात येणारे २० गुण कमी करुन ते सीबीएसई बोर्डात का देण्यात आले?

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पानसरे, दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडचे खाते बाजूला करून गृहखात्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा.

रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. बेरोजगार तरुणाना भत्ता दिला पाहिजे. राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे, कर्जाचा डोंगर आहे. आर्थिक बाबतीत उत्तम असल्याचा केवळ आभास निर्माण केला जात आहे. स्मार्ट सिटीचे काम नाही, केवळ आभास आहे. नाणारचा प्रकल्पही गुजरातला नेला जातोय. राज्यात उद्योगाची बिकट परिस्थिती आहे.

सामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Best Reader's Review