Breaking News

विरोधी पक्षनेता ते थेट कॅबिनेट मंत्री

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 07:59:57 pm
  • 5 comments

विरोधी पक्षनेता ते थेट कॅबिनेट मंत्री

 

विखेंना साठाव्या वाढदिवशी मोठे 'गिफ्ट'

 

मुंबई : राधाकृष्ण विखेपाटील यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला. रविवारी सकाळी ११ वाजता त्यांनी शपथ घेतली. विशेषतः म्हणजे विखेपाटील यांचा शनिवारी साठावा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना मोठे 'गिफ्ट' मिळाले असून त्यांनी रविवारी सहाव्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यांना मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खाते मिळण्याची जास्त शक्यता आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विखे हे मनोहर जोशी व नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. तेथे आघाडी सरकारमध्ये कृषी, शिक्षण, न्याय व विधी आदी खाती त्यांनी सांभाळली. आता ते भाजपकडून मंत्री होतील. विविध पक्षांतरे करून सत्तेत राहणारे विखे हे महाराष्ट्रातील एकमेव नेते असण्याची शक्यता आहे.

दरम्यान विखेपाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी राज्यातील दुष्काळ परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत कार्यकर्त्यांना दुष्काळ निवारणासाठी आवाहन केले आहे. माझ्या वाढदिवसादिवशी कोणतेही पुष्पगुच्छ. बॅनर यावर खर्च न करता दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

Best Reader's Review