कोण आहेत मंत्रीमंडळातील नवे चेहरे ?

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 07:54:59 pm
  • 5 comments

कोण आहेत मंत्रीमंडळातील नवे चेहरे ? 

 

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यावेळी १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा शपथविधी पार पडला. राधाकृष्ण विखेपाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके आदींनी यावेळी शपथ घेतली.

 

राधाकृष्ण विखेपाटील कॉंग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते पदी असणारे राधाकृष्ण विखेपाटील आता थेट कॅबिनेट मंत्री झाले आहेत.आघाडी सरकारमध्ये कृषी, शिक्षण, न्याय व विधी आदी खाती त्यांनी सांभाळली होती. नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात ते कृषिमंत्री होते.

 

अॅड आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष असणारे आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत २६ हजार ९११ मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. विधान परिषद आणि विधानसभेत आमदार म्‍हणून त्‍यांनी नागरी चळवळीत त्यांचा विशेष सहभाग आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेवर जुलै २०१२ रोजी बिनविरोध निवडून आले. यापूर्वी अभाविप, मुंबई सचिव, भाजप, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष, मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांचे गटनेते, सुधार समितीचे अध्‍यक्ष, एमएमआरडीए सदस्य आदी पदांचा कार्यभार त्यांना यापूर्वी सांभाळला आहे.

 

डॉ. संजय कुंटे जळगावच्या जामोद मतदार संघातून दोनवेळा आमदार झालेल्या डॉ. संजय कुंटे यांनही शपथ घेतली. ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष, शेगाव विकास आराखडा समिती सदस्य, आश्वासन समिती सदस्य, धर्मदाय रुग्णालय तदर्थ समिती सदस्य आदी पदे ते सांभाळत आहेत. तसेच सहकारी जिल्हा बॅंक, बुलडाणा बॅंकेवर संचालक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समिती सदस्य आदी पदांचा कारभार त्यांनी सांभाळला आहे.

 

अतूल सावे १९९८ ते २००३ पर्यंत भाजपचे औरंगाबाद अध्यक्ष असलेले अतूल सावे यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या राज्य समितीवर तीन वर्षे त्यांनी काम पाहीले आहे. भाजपचे राज्य सचिव म्हणून २००९ ते २०१२ आणि २०१२ ते २०१५ पर्यंत कार्यभार सांभाळला आहे.

 

अविनाश महातेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला यावेळी राज्यात एक मंत्रीपद देण्याची मागणी रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नाव सुचवण्याचे सूचना आठवले यांना केली होती. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यानुसार महातेकर यांना स्थान देण्यात आले आहे. दलित , कष्टकऱ्यांवर होत आसलेल्या अन्याय - अत्याचाराविरुद्व आवाज उठविणे, त्यासाठी संघर्ष करणे हा त्यांचा स्थायीभाव . दलित पँथरच्या फुटीनंतर रिपब्लिकन पक्षात सहभाग . १९९० पासून रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या वैचारिक बांधणीत सहभाग.

 

डॉ. परिणय फुके भंडारा-गोंदीया विधानपरिषद मतदार संघातून आमदार झालेले डॉ. परिणय फुके यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात २००७च्या नागपूर महापालिका निवडणूकीत नामांकन दाखल केले होते. विधानसभा निवडणूकीत १९९९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

 

सुरेश खाडे सुरेश खाडे हे मिरज येथून भाजपचे आमदार आहेत. त्यांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. भाजपाचा प. महाराष्ट्रातला अनुसुचित जातीचा चेहरा, अशी त्यांची ओळख आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात त्यांना यश आले आहे. 2004 साली सांगली जिल्ह्यातल्या जतमधून ते विजयी झाले होते. २००९, २०१४ या दोन्ही वर्षी सर्व प्रतिस्पर्ध्यांची अनामत रक्कम जप्त करून ते विजयी झाले होते. मिरजेतील ३७ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. सांगली मिरज-कुपवाड मनपावर भाजपची सत्ता आणण्यात महत्वाचे योगदान आहे.

 

अनिल बोंडे : भाजप आमदार अनिल बोंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. अमरावतीतील मोर्शीचे भाजप आमदार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने मोर्शी येथून बोंडे मोठ्या फरकाने निवडून आले. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात त्यांचा पुढाकार असतो.

 

तानाजी सावंत : शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना नव्या झालेल्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे, यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. २०१५ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट, अशी त्यांची ओळख आहे. उस्मानाबादच्या राजकारणावर चांगली पकड असून ‘लक्ष्मी’पुत्र अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तीनदा निवडणूक लढवली होती. दोनवेळा शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे तर एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आहे.

 

अशोक उईके : भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते आमदार २०१४ मध्ये वसंत पुरकेंचा पराभव करून विजयी झाले आहेत. विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राळेगाव, कळंब, बाभुळगावमधील नगरपंचायती जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

योगेश सागर : भाजप आमदार योगेश सागर हे मुंबईतील चारकोप मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. योगेश सागर हे प्रसारमाध्यमांमध्ये भाजपची भूमिका ठामपणे मांडत असतात. रविवारी त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

संजय (बाळा) भेगडे : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष पुण्याच्या ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या संजय (बाळा) भेगडे यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. २०१४ मध्ये ते मावळमधून विधानसभेवर निवडून आले आहेत. बाळा भेगडे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
 


Best Reader's Review