अनोख्या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत स्वतंत्र वीज रोहित्र पोहोचविणार - पालकमंत्री पंकजा मुंडे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 02:16:40 pm
  • 5 comments

अनोख्या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत स्वतंत्र

वीज रोहित्र पोहोचविणार - पालकमंत्री पंकजा मुंडे

 

बीड : राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून उच्च दाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून 188 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, याअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वीज रोहित्र दिले जाते, असे प्रतिपादन पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने आयोजित  एक शेतकरी एक डीपी योजनेच्या जिल्ह्यातील शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. परळी तालुक्याच्या पांगरी गावातील विष्णू नागोराव पांचाळ या अल्पभूधारक शेतकऱ्यास शासनाच्यावतीने बसविण्यात आलेला 10 केवी क्षमतेच्या उच्चदाब रोहित्राचे उद्घाटन श्रीमती  मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, महावितरणचे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रामदास कांबळे, बीड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता मंदार वैज्ञानिक, ए.आर. पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. थिटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, महावितरणच्या या अनोख्या योजनेमुळे वीजगळती कमी होणार असून वीज चोरी देखील रोखले जाईल. या योजनेतून एका रोहित्रा मधून एक अथवा जास्तीत जास्त दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल. पूर्वी एकाच रोहित्रा वर अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या असल्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, अतिरिक्त वीज देयक प्राप्त होणे, याबाबत तक्रारी प्राप्त व्हायच्या परंतु या नवीन योजनेमुळे जितका वापर तितके देयक शेतकऱ्याला भरावे लागेल. याचबरोबर शासनाने शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना, महावितरण आपल्या दारी ही योजना देखील राबवली याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यापूर्वी मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना देखील या नव्या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ते निर्देश देण्याबाबत कार्यवाही करू, असे मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी शासन काम करीत आहे. यामुळेच या योजनेतून शेतकऱ्यांना विनाखर्च त्याचा शेतापर्यंत वीज रोहित्र बसविले जात आहेत. यासाठी महावितरण कंपनीला शासनाने उद्दिष्ट आखून दिले असून निधी उपलब्ध करून दिला आहे.

मुख्य अभियंता श्री.कांबळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महावितरण काम करत असून सौर कृषी पंप योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योति योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे वीज वितरणावरचे ओव्हर लोडिंग कमी होणार आहे.

यावेळी लाभार्थी शेतकरी विष्णू पांचाळ यांचेसह सर्व कुटुंबासहित सत्कार मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Best Reader's Review