Breaking News

निषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत का पाकिस्तान मध्ये घुसून कंबरडं मोडणारे?-उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 05:42:34 pm
  • 5 comments

निषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत का पाकिस्तान

मध्ये घुसून कंबरडं मोडणारे--उद्धव ठाकरे

खामगाव/हिंगोली

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा जाहीरनाम्यात करणाऱया काँग्रेसला आणि त्यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा मिळू देऊ नका, अशी जबरदस्त हाक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी खामगाव आणि हिंगोली येथे आयोजित जाहीर सभांमध्ये दिली. ‘बाळा राहुल, ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे. इथे आमचे देशप्रेम तुमच्या देशद्रोहाला भारी पडेल!’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चिंधडय़ा उडवल्या. तेव्हा या सभांना उसळलेल्या भगव्या वादळाने टाळय़ांचा प्रचंड कडकडाट करून त्यावर मोहोर उठवली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तुफानी जाहीर सभांचा दुसरा टप्पा शुक्रवारी विदर्भातून सुरू झाला. बुलढाण्यातील खामगाव येथे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि हिंगोलीत महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभा अलोट गर्दीत झाल्या.

दोन्ही सभांमध्ये गर्दीचा जल्लोष आणि आवेश पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, आपली उन्हामुळे डोकी तापत आहेत. पण ती केवळ उन्हामुळेच तापून चालणार नाहीत, आपली डोकी आता विचारांनी तापली पाहिजेत. हिंदुत्वाच्या विचारांनी तापली पाहिजेत, मोदींनी एकदा नव्हे दोन वेळा पाकिस्तानात सैन्य घुसवून हल्ले केले. मोदींना मत का? त्याचे हेच उत्तर आहे. सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करू नका, अशी टीका विरोधक करताहेत, आमचेही सुरुवातीपासून हेच म्हणणे आहे, पण सैनिकांच्या शौर्याचे राजकारण होऊ नये, तसाच सैनिकांच्या शौर्याचा अपमानही होऊ नये, ही आमची भूमिका आहे. सैनिक कसे घुसले, कुठे घुसले, तिथे दहशतवाद्यांचा तळ होता का? किती मारले? असे प्रश्न विरोधकांनीही विचारू नये, पुरावे मागू नका म्हणजे राजकारणाचा विषयच येणार नाही. शरद पवार आधी म्हणाले की, सरकारने माझ्या सल्ल्यानेच पाकवर हवाई हल्ला केला. आणि नंतर म्हणाले, कुठे केला? आहो, पवारसाहेब हल्ला केला की नाही केला? काहीतरी एक सांगा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करणाऱया काँग्रेसला आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीला मतदान करणाऱया मतदारांना देशद्रोहाचा कायदा रद्द झालेला चालणार आहे काय, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, मी टीका समजू शकतो; पण उद्या दाऊद आला आणि देशद्रोहाचा कायदा नाही, म्हणून घेणार आहात त्याला काँग्रेसमध्ये? देणार आहात त्याला लोकसभेची उमेदवारी? देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणाऱया कन्हैयाकुमारसारख्या देशद्रोहय़ांना कडेवर घेणाऱया काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रात एकही जागा मिळू देऊ नका. बुलढाणा आणि हिंगोलीसह महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार विजयी करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

शेतकऱयांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी पाच एकरची मर्यादा शिथील करण्याची घोषणा नगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करून उद्धव ठाकरे म्हणाले की, या घोषणेमुळे आता अल्पभूधारक, मध्यम आणि मोठय़ा शेतकऱयांनाही आता सरकारी योजनांचा लाभ होईल.

मी शपथ घेत आहे…शेवटपर्यंत शेतकऱयांसोबत!

पाच वर्षांपूर्वी दीपाली कोलते या दहावीतील शेतकरीकन्येने केलेल्या आत्महत्येची बातमी वाचून आपल्या अंगावर काटा आला होता. याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, दीपालीने ‘शेतकरी आत्महत्या का करतोय’ या विषयावर शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट भाषण केले. तिला पहिले पारितोषिक मिळाले. म्हणून अभिनंदन करण्यासाठी लोक गेले, तर आपल्या शेतकरी पित्याच्या काळजीने दीपालीने आत्महत्या केली होती! कर्जबाजारी वडिलांवर आपले ओझे नको म्हणून दीपालीने आपले जीवन संपवले. ही आत्महत्या मी कधीच विसरू शकत नाही. विसरणार नाही. म्हणून मी शपथ घेतलीय, मला जी ताकद शिवप्रभूंनी दिलीय, बाळासाहेबांनी दिलीय, देवादिकांनी, आई जगदंबेने दिलीय, ती सगळी ताकद पणाला लावून मी शेवटपर्यंत शेतकऱयांसोबत उभा राहीन! ही शपथ मी या व्यासपीठावरून जाहीरपणे घेत आहे. कुठल्याही व्यासपीठावरून मी ही शपथ घेईन, असा शब्दच उद्धव ठाकरे यांनी दिला.

सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करू नका, अशी टीका विरोधक करताहेत, आमचेही सुरुवातीपासून हेच म्हणणे आहे, पण सैनिकांच्या शौर्याचे राजकारण होऊ नये, तसाच सैनिकांच्या शौर्याचा अपमानही होऊ नये, ही आमची भूमिका आहे.

Best Reader's Review