Breaking News

राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 04:56:16 pm
  • 5 comments

राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी?

विनोद तावडे यांचे मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट करावे अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा  निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या,  शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचारप्रत्यक्षपणे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच  उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवित नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही, असे  तावडे यांनी पत्रात म्हटले आहे.

    या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नांव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा असा प्रश्नउपस्थित केला जाऊ शकतो. परंतु राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे की, त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

   राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचे स्पष्टीकरण घ्यावे. असेही श्री.तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

राज ठाकरे हे भाषणे नव्हे तर स्टॅंड अप कॉमेडीचे शो करतात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सध्या स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत अशी टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत, पण आपल्या जाहीर सभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करत आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे सध्या मोदी व अमित शहा यांना संपविण्याची भाषा करित असल्याबददल त्यांच्यावर टीका करताना तावडे उपरोधिकपणे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वतचा पक्ष संपला असताना दुस-याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात असा टोलाही त्यांनी मारला.

 

एका बाजूला नरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत आणि राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. पण जगामध्ये हिटलरचे असे कोणी स्वागत केले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रिसोर्स टीमने नीट माहिती काढावी व ती त्यांना दयावी. त्यामुळे मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल असा टोलाही तावडे यांनी मारला.

भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन असे विधान करणा-या अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, अजित पवार फक्त हूल देत आहेत. अजित पवार हे कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात एंट्री करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजित पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Best Reader's Review