राज ठाकरे भाडोत्री नेता? वाचा महाराष्ट्राच्या मनात काय?

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 04:45:58 pm
  • 5 comments

राज ठाकरे भाडोत्री नेता? वाचा महाराष्ट्राच्या मनात काय?

 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आपल्या भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. बारामतीचा पोपट, भाडोत्री नेता, राजू पेंटर, स्टँड अप कॉमेडीवाला अशी अनेक विशेषणे त्यांच्या नावापुढे जोडली गेली आहेत. याचं कारणही तसंच आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'मनसे' पाठिंबा जाहीर केला होता. पण, त्यांच्या मते मोदींनी मागील पाच वर्षात देशाचं वाटोळं केले. यावर राज यांनाही प्रश्न विचारण्यात येतो आहे की, पक्षांचं आणि कार्यकर्त्यांचं वाटोळं करण्याइतपत तुमच्यावर कोणती नामुष्की ओढावली होती?

राज यांच्या भूमिकेमुळे त्यांच्याचेच मनसैनिक नाराज आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही मनसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, "राज साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आम्ही बिलकुल मतदान करणार नाहीत. देशात आम्ही पंतप्रधान मोदींना मानतो आणि राज्यात राज साहेबांना पण तरीही आम्हाला त्यांचा आदेश मान्य नाही. आम्ही मोदींनाच मतदान करणार." अशा अनेक तक्रारींचा सूर मनसैनिकांच्या बोलण्यातून दिसून येत होता. तर काही जणांनी राज यांच्यावरच गंभीर आरोप केले. शरद पवार, काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर आजपर्यंत सोशल मिडियावरून चिखलफेक केली आणि आता त्यांना मतदान कसं द्यायचा असाही अनेक मनसैनिकांना प्रश्न पडला आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनीही राज यांच्यावर गंभीर आरोप केले. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की, राज ठाकरे हे तोडपाणी करणारे नेते आहेत. निवडणुका आल्या की भाषणबाजी करायची आणि पैशाच्या पेट्या मिळाल्या की शांत राहायचं. राज यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

राज यांच्या भाषणबाजीवर भाजप नेते चांगलेच तोंड सुख घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज यांना बारामतीचा पोपट, भाडोत्री नेता अशी अनेक विशेषणे दिली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर राज यांची भाषणे म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, उरलेसुरले नगरसेवकही पक्ष सोडून गेले आणि हे दुसऱ्यांना संपवायची भाषा करतात. असाही टोला त्यांनी लगावला. तर काही नेत्यांनी त्यांना अनुल्लेखानेच टोला मारला.

राज यांची खिल्ली उडवली जात असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एवढीच काय ते राज यांची कमाई. राज यांच्या समर्थनार्थ काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरसावले आहेत. मोदी देशासाठी नको आहेत, यासाठी आणखी एक तडफदार नेता मोदींच्या विरोधात प्रचार करत असून राज यांचे महाआघडीत फक्त कार्यकर्त्यांनीच स्वागत केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र राज हे आमच्यासोबत नसल्याचे जाहीर केले आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही, तर निवडणूक आयोग बुचकळ्यात सापडला आहे. राज यांच्या भाषणाचा खर्च कसा आणि कोठे लावायचा याचं कोडं आयोगाला पडला आहे.

तर एकंदरीत राज यांनी मोदी द्वेष पत्कारून स्वतःचच हसू करून घेतलं आहे. राज हे नेमके कोणाचे? ते सभा का घेतात? कोणासाठी घेतात? पक्ष लोकसभा का लढवत नाही? मोदी द्वेशामागील राज यांचा स्वार्थ काय? असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे.

Best Reader's Review